स्वीकृत सदस्यपदावरून निर्माण झालेल्या वादाचा परिणाम १७ एप्रिलला होणाऱ्या झोन सभापतिपदाच्या निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे. एमआयएमए आणि मुस्लीम लीग यांची महापालिकेत युती आहे. एमआयएमचे सहा आणि लीगचे चार या दहा नगरसेवकांच्या संख्याबळावर आशीनगर झोनचे सभापतिपद मिळण्याची शक्यता आहे. मात्र, या वादामुळे यावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडणुकीसाठी पक्षश्रेष्ठींनी ठरविलेल्या उमेदवाराखेरीज स्थानिक नेते वेगळ्याच उमेदवाराला अर्ज दाखल करण्यासाठी घेऊन आले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. या गदारोळात एमआयएम निर्धारित वेळेपर्यंत अर्ज दाखल करू शकला नाही.
नागपूर महापालिकेच्या स्वीकृत सदस्यांच्या दहा जागांसाठी बुधवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस होता. संख्याबळाच्या आधारावर दहा जागांपैकी सात जागा सत्ताधारी भाजप, दोन काँग्रेस आणि एक जागा एमआयएम आणि मुस्लीम लीग युतीच्या वाट्याला आली आहे. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाझ जलील यांनी पक्षाच्यावतीने फहीम अन्सारी यांचे नाव अधिकृतपणे जाहीर केले. पक्षाच्यावतीने समाजमाध्यमावर या नावाची घोषणा करण्यात आली. त्यामुळे अन्सारी अर्ज भरण्यासाठी महापालिकेत दाखल झाले. तिथे नाटकीय घटनाक्रम घडला. एमआयएमचे महापालिकेतील गटनेते शकील पटेल आणि इंडियन मुस्लीम लीगचे नेते नगरसेवक अस्लम खान यांनी अन्सारी यांना बाजूला सारत नरेंद्र जिचकार यांना अर्ज भरण्यासाठी पुढे केले. त्यामुळे अन्सारी यांचे समर्थक संतापले व गोंधळाला सुरुवात झाली. एका जागेसाठी दोन जणांनी दावा केल्याने नेमका उमेदवार कोण, असा प्रश्न महापालिका आयुक्त डॉ. विपीन इटनकर यांनी उपस्थित केला. ‘तुम्ही एक नाव ठरवा’, असे त्यांनी सांगितले. पक्षाकडून नावावर एकमत होऊ न शकल्याने दुपारी ३ वाजेपर्यंत कुणाचाही अर्ज दाखल केला गेला नाही.
यासंदर्भात बोलताना, श्रेष्ठींनी ठरविलेले उमेदवार अन्सारी म्हणाले, ‘पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी माझे नाव जाहीर केले होते. मात्र, स्थानिक नेत्यांनी ते शेवटच्या क्षणाला बदलले. निर्धारित वेळेपर्यंत मला थांबण्यास सांगण्यात आले. इतकेच नव्हे तर माझ्याऐवजी ऐनवेळी निश्चित करण्यात आलेल्या उमेदवाराचा अर्ज दाखल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पक्षश्रेष्ठींनी जाहीर केलेल्या आदेशाचे पालन होत नसून खरेदी- विक्रीचे व्यवहार काही नेतेमंडळींकडून सुरू आहेत. त्यामुळे पक्षाच्या चांगल्या कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही.’
‘मी माझ्या खासगी कामानिमित्त महापालिकेत गेलो होतो. तिथे काही काळ होतो. मी एमआयएमचा उमेदवार होणार होतो, ही कपोलकल्पित बातमी आहे’, असा दावा नरेंद्र जिचकार यांनी केला.
भाजप, काँग्रेस,
सेनेकडून अर्ज सादर
स्वीकृत सदस्यपदासाठी संख्याबळाच्या आधारावर भाजपच्या वाट्याला सात जागा होत्या. त्यांनी एक जागा मित्रपक्ष शिवसेनेला सोडली. बुधवारी भाजपकडून संजय ठाकरे, जितू ठाकूर, सुबोध आचार्य, रितेश गावंडे, देवेंद्र मेहेर, विनोद बघेल यांनी, तर काँग्रेसकडून केतन ठाकरे, अतुल कोटेचा यांनी आणि शिवसेनेकडून शहरप्रमुख सूरज गोजे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.


