नागपूर : पत्नीच्या विरहात जिम ट्रेनरने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आत्मीय अपार्टमेंट येथे घडली. राकेश शंकर शर्मा (वय ४०, मूळ रा. काटोल) असे मृताचे नाव आहे. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, गेल्या काही वर्षांपासून ते पत्नीपासून विभक्त राहायचे. त्यामुळे त्यांना दारूचे व्यसन जडले. ते तणावात राहायला लागले. मंगळवारी रात्री त्यांनी पंख्याला चादर बांधून गळफास घेतला. त्यांचे मित्र अजिंक्य यांनी राकेश यांच्या मोबाइलवर संपर्क साधला. राकेश यांनी प्रतिसाद दिला नाही. अजिंक्य हे राकेश यांच्या फ्लॅटवर गेले. त्यांनी फ्लॅटमालकाला माहिती दिली. त्यानंतर दोघांनी फ्लॅटचा दरवाजा तोडला असता राकेश हे गळफास लावलेले दिसले. अजिंक्य यांनी बेलतरोडी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी पंचनामा करून राकेश यांचा मृतदेह हॉस्पिटलकडे रवाना केला. बेलतरोडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.


