राऊळगाव येथील एसबीएल कंपनीत झालेल्या भीषण स्फोटाप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळला. त्यानंतर कंपनीच्या संचालक मंडळातील सदस्यांपैकी एक अलोक अवधिया याच्याखेरीज सात अशा एकूण आठ जणांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे. याप्रकरणी पोलिसांनी ३० मार्चपर्यंत उत्तर सादर करणे अपेक्षित होते. मात्र, अद्याप उत्तर सादर न झाल्याने आता पुढील सुनावणीला कोणत्याही परिस्थितीत युक्तिवाद सुरू होईल, अशी मौखिक तंबी देत न्यायालयाने पोलिसांना अखेरची संधी दिली आहे.
१ मार्च रोजी कंपनीच्या परिसरात भीषण स्फोट झाला. यात आतापर्यंत २५ कामगारांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणातील फरार असलेल्या ११पैकी सहा आरोपींनी जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली. न्यायालयाने अवधिया यांच्यासहित सर्वच आरोपींची अर्ज फेटाळून लावले होते. यानंतर आता अवधिया यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या स्फोटाशी तसेच यामागील कारणांशी आपला प्रत्यक्ष संबंध नसल्याचा दावा त्यांनी या अर्जात केला आहे. आरोपीतर्फे वरिष्ठ अधिवक्ते महेश जेठमलानी यांनी बाजू मांडली त्यांना ॲड. आदित्य चौधरी यांनी सहकार्य केले. याखेरीज केदार पंचपुत्रे, सत्यव्रती पाराशर, श्रवण कुमार, रवींद्र पोखर्णा, मनोज कुमार प्रसाद, आलोक चौधरी व संजय चौधरी अशा सात आरोपींनीही अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.


