नागपूर : मोटारयासकल वेगाने चालविण्याबाबत हटकल्याने युवकाने साथीदाराच्या मदतीने तरुणावर चाकूहल्ला केला. ही घटना अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नवीन बाबुलखेडा येथे घडली. याप्रकरणी अजनी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध हल्ल्याचा गुन्हा दाखल केला.
आंबा ऊर्फ वैभव शेंडे, प्रिन्स जांभुळकर, बाबू ऊर्फ झेव्हियर लॉरेन्स, रौनक बैसवारे व मयंक खन्ना अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. साहिल देवेंद्र तेलमोरे (वय २२, रा. नवीन बाबुलखेडा) असे जखमीचे नाव आहे. साहिल हा ऑटोचालक असून ढोल वाजवितो. तीन महिन्यांपूर्वी साहिलचा भाचा स्वरांश हा घरासमोर खेळत होता. यावेळी बाबू झेव्हियर लॉरेन्स हा दोन मित्रांसह वेगाने मोटारसायकल चालवित तेथून गेला. साहिलने त्याला ‘मोटारसायकल हळू चालव’, असे म्हणत हटकले. यावेळी बाबूने त्याच्याशी वाद घातला व ठार मारण्याची धमकी दिली. मंगळवारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त साहिल हा मिरवणुकीत ढोल वाजवित होता. तो थकल्याने पाणी पिण्यासाठी बंटीच्या घराजवळ थांबला. याचवेळी आंबा, पिन्सू, बाबू, मयंक व रौनक तेथे आले.








