श्वासांच्या तपासणीतून शोधणार मधुमेह

महाराष्ट्र टाइम्स

नागपूर विद्यापीठातील संशोधकांनी श्वासांच्या तपासणीतून मधुमेह ओळखणारे उपकरण तयार केले आहे. या उपकरणाला यूके डिझाइनचे नोंदणी प्रमाणपत्र मिळाले आहे. रक्ताच्या चाचणीला हा एक सोपा आणि सुरक्षित पर्याय ठरू शकतो. नियमित तपासणी करणाऱ्या मधुमेहींसाठी हे उपकरण फायदेशीर ठरेल. या उपकरणाची अचूकता वाढवण्यासाठी पुढील प्रक्रिया सुरू आहे. या संशोधनामुळे मधुमेहाची तपासणी अधिक सुलभ होणार आहे.

diabetes diagnosis made easy through breath testing

रक्ताच्या चाचणीतून मधुमेहाचे निदान करण्याची पद्धत सर्वत्र रुढ आहे. मात्र, आता श्वासांच्या तपासणीतून एखाद्या व्यक्तीला मधुमेह आहे किंवा नाही, याचे निदान करता येणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर प्राणिशास्त्र विभागातील संशोधकांनी यासाठीचे उपकरण विकसित केले आहे. ‘नॉन-इन्व्हेसिव्ह डायबिटीस मॉनिटरिंग डिव्हाइस’ या उपकरणाला यूके डिझाइनचे नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.

मधुमेह हा अनेकांमध्ये आढळणारा आजार आहे. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने मधुमेह होतो आणि त्याचे शरीरातील इतर अवयवांवर दुष्परिणाम होतात. मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी वारंवार चाचणी करण्याची गरज भासते. पारंपरिक पद्धतीनुसार मधुमेह चाचणी करण्यासाठी शरीरातील रक्ताचे नमुने घेतले जातात. तपासणीच्या या पारंपरिक पद्धतीला पर्याय म्हणून श्वासांच्या माध्यमातून मधुमेहाची तपासणी करण्याचे उपकरण डिझाइन करण्यात आले आहे.

या उपकरणाद्वारे श्वासाच्या विश्लेषणातून रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण मोजता येते. त्यामुळे नियमित तपासणीची गरज असलेल्या मधुमेह रुग्णांसाठी ही पद्धत अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर ठरणारी आहे. प्राणिशास्त्र विभागाच्या संशोधकांनी केलेल्या या संशोधनामुळे मधुमेहाची तपासणी अधिक सुलभ ठरणार आहे. विद्यापीठाच्या पदव्युत्तर प्राणिशास्त्र विभागाने विकसित केलेल्या श्वास-आधारित नॉन-इन्व्हेसिव्ह मधुमेह मॉनिटरिंग उपकरणासाठी यूके डिझाइन नोंदणीचे प्रमाणपत्र मि ळविले आहे. या उपकरणाची संकल्पना यापूर्वी अविष्कार संशोधन महोत्सव २०२४मध्ये सादर करण्यात आली होती. या महोत्सवात हर्ष तिवारी यांच्या प्रकल्पाला नावीन्यपूर्णतेसाठी पुरस्कार मिळाला होता. सद्यस्थितीत हे उपकरण यशस्वीरित्या विकसित करण्यात आले असून, त्याची अचूकता आणि व्यावहारिक उपयोगिता वाढवण्यासाठी पुढील कॅलिब्रेशन व व्हॅलिडेशन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे

या प्रकल्पात पदव्युत्तर प्राणिशास्त्र विभागप्रमुख डॉ. वर्षा धुर्वे, हर्ष तिवारी आणि सबरीन बानो मोहम्मद जावेद मन्सुरी यांचा प्रामुख्याने समावेश आहे. याशिवाय, बालाघाट येथील डॉ. दुर्गेश आगासे डॉ. तनुश्री आगासे, नागपूरच्या डॉ. रश्मी उरकुडे, अमरावतीचे डॉ. अंकित काळे आणि आयर्लंड येथील इरा उरकुडे यांचेही महत्त्वपूर्ण योगदान आहे.