शैक्षणिक संस्थांची आज होणार बैठक

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

नागपूर जिल्हा शिक्षण कृती समितीची महत्त्वाची बैठक आज सायंकाळी ५.३० वाजता आयोजित केली आहे. शिक्षण क्षेत्रातील प्रश्न, अडचणी आणि आगामी नियोजनावर चर्चा होईल. मानेवाडा-बेसा मार्गाचे रखडलेले बांधकाम आणि अतिक्रमणामुळे नागरिकांना त्रास होत आहे. रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी आहे. एमआयडीसीत घरफोडी होऊन सव्वादोन लाखांचा ऐवज चोरीला गेला.

important meeting of educational institutions in nagpur today

नागपूर : नागपूर जिल्हा शिक्षण कृती समितीच्यावतीने जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनांची एक महत्त्वपूर्ण बैठक आज, गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजता महाल येथील श्रीमती दादीबाई देशमुख हिंदू मुलींची शाळा येथे आयोजित करण्यात आली आहे. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध प्रश्न, अडचणी व आगामी नियोजनावर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. या बैठकीस सर्व संबंधितांनी उपस्थित राहावे, असे आवाहन नागपूर जिल्हा शिक्षण कृती समितीचे संयोजक रवींद्र फडणवीस यांनी केले आहे.

रस्ते पूर्ण करा!

नागपूर : मानेवाडा-बेसा मार्ग कमालीचा धोक्याचा झाला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून या मार्गाचे बांधकाम रखडलेले असल्याने नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. परिणामी, अपघातांत वाढ झाली आहे. शिवाय, या मार्गावरील अतिक्रमण ही मोठी डोकेदुखी आहे. वाहतूक विस्कळीतचा सामना येथे रोजच करावा लागतो. ही समस्या तत्काळ सोडवावी, रस्त्याचे बांधकाम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.

एमआयडीसीत घरफोडी

नागपूर : एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील महाजनवाडीतील जगताप लेआउट येथील भगीरथ पार्क येथे घरफोडी करून चोरट्याने रोख रकमेसह सव्वादोन लाखांचा ऐवज चोरी केला. १२ एप्रिलला मनोज केशवराव धनविजय (वय ५०) हे कुटुंबासह चंद्रपूर येथे सासऱ्याकडे गेले. संधी साधून चोरट्याने दरवाजाचे कुलूप तोडले. आलमारीतील ९० हजारांची रोख, टीव्हीचे सुटे भाग व सोन्याचे दागिने असा एकूण सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास केला. मंगळवारी दुपारी ही घटना उघडकीस आली. धनविजय यांनी एमआयडीसी पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला.