सुआ क्लबचा जीएसटी क्रमांक खरा की चुकीचा?

महाराष्ट्र टाइम्स

सुआ क्लब रेस्ट्रोचा जीएसटी क्रमांक खरा की चुकीचा, याचा तपास पोलीस करत आहेत. यासाठी वस्तू व सेवा कर विभागाला पत्र पाठवले आहे. चुकीचा नंबर वापरून जीएसटी बुडवला जात होता का, या दिशेनेही तपास सुरू आहे. खंडणी प्रकरणी सुआ क्लबचा मालक आकाश गजबे याला अटक झाली असून, तो न्यायालयीन कोठडीत आहे. पोलीस त्याच्या कोठडीसाठी प्रयत्न करत आहेत.

is the gst number of suwa club genuine or fraudulent start of police investigation

एलआयसी चौकातील सुआ क्लब रेस्ट्रोचा जीएसटी नोंदणी क्रमांक खरा की चुकीचा, याबाबत माहिती मिळविण्यासाठी सदर पोलिसांनी वस्तू व सेवा कर विभागाला पत्र लिहिले आहे. त्यामुळे सुआचा मालक आकाश गजबे हा चुकीचा नंबर वापरून जीएसटी बुडवित होता का, या दिशेनेही आता पोलिस तपास करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हर्षद नरेंद्र हटवार (वय ३५, रा. शाहूनगर, मानेवाडा) याच्याकडून ३४ हजार २१३ रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी सदर पोलिसांनी गजबे, त्याची पत्नी सुप्रिया, बाउन्सर उज्ज्वलकुमार सुधांशू, राज व तनू या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी राजला अटक करून त्याची पोलिस कोठडी घेतली. गजबे यालाही पोलिसांनी अटक केली. त्याला मंगळवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीअंतर्गत कारागृहात रवानगी केली. सदर पोलिस याविरोधात अपील करणार होते. परंतु, बंदोबस्तात व्यस्त असल्याने अपील करण्यात आले नसल्याचा दावा सदर पोलिसांनी केला आहे. गजबेला अटक करू नये, यासाठी एक नेता सदर पोलिस ठाण्यात तळ ठोकून होता. परंतु, पोलिसांनी त्याला अटक केली. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. सदर पोलिस त्याची पोलिस कोठडी मिळविण्यात यशस्वी होतील का, याकडे लक्ष लागले आहे. सुआचा नोंदणी क्रमांक खरा आहे का, याबाबत जीएसटी विभागाला पत्र पाठविण्यात आले आहे, अशी माहिती सदर पोलिसांनी दिली.