नाशिक : गेल्या वर्षभरात सोने-चांदीच्या दरात विक्रमी वाढ होऊनही ग्राहकांचा खरेदीकडे ओढा कायम असून, त्याचा प्रत्यय रविवारी अक्षय्य तृतीयेला आला. असंख्य ग्राहकांनी चोख सोने-चांदीसह दागिन्यांच्या खरेदीचा मुहूर्त साधला.
हिंदू धर्मात अक्षय्य तृतीयेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशीची खरेदी शुभ मानली जाते. त्यामुळे सोन्या-चांदीची खरेदी आवर्जून केली जाते. गेल्या वर्षी अक्षय्य तृतीयेला (दि. ३० एप्रिल) २४ कॅरेट सोने ९८ हजार ३६० रुपये प्रतितोळा, २२ कॅरेट सोने ९० हजार ४९० रुपये प्रतितोळा, तर चांदी ९८ हजार ८८० रुपये प्रतिकिलो असे दर होते. मात्र, आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे सोने-चांदीने दरांचे सर्व उच्चांक मोडीत काढले. परिणामी, वर्षभरात सोने सुमारे ६० हजार रुपये प्रतितोळा, तर चांदी तब्बल दीड लाख रुपये प्रतिकिलोने वाढली. गेल्या काही दिवसांपासून मात्र दर स्थिर आहेत. रविवारी २४ कॅरेट सोने एक लाख ५८ हजार १०० रुपये प्रतितोळा, २२ कॅरेट सोने एक लाख ४५ हजार ४६० रुपये प्रतितोळा, तर चांदी दोन लाख ६९ हजार ८६० रुपये प्रतिकिलो असे दर होते, असे सराफ असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश नवसे यांनी सांगितले. ग्राहकांनी चोख सोने-चांदीसह लग्नसराईत लागणाऱ्या दागिन्यांची मुहूर्तावर खरेदी केली. त्यामुळे शहरातील सराफी पेढ्यांमध्ये वर्दळ दिसून आली.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींमुळे बांधकाम साहित्य महागल्याने सदनिकाही काही प्रमाणात महागल्या आहेत. त्यामुळे बांधकाम क्षेत्राला काहीसा कमी प्रतिसाद मिळण्याची शक्यता होती. मात्र, अक्षय्य तृतीयेनिमित्त नाशिककरांमध्ये खरेदीचा उत्साह दिसून आला. रविवारी अक्षय्य मुहूर्तावर पाचशे सदनिकांचे ‘बुकिंग’ झाले. यावेळी व्यावसायिक गाळ्यांसह टू-बीएचके आणि थ्री-बीएचके सदनिकांना पसंती मिळाली.








