थंडगार कुल्फी, की भेसळीचा विषारी गोळा!

महाराष्ट्र टाइम्स

अहिल्यानगर जिल्ह्यात खाद्यतेलापासून बनवलेली भेसळयुक्त कुल्फी जप्त झाली आहे. यामुळे नाशिकमधील कुल्फी कारखान्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नाशिकमध्ये अनेक वर्षांपासून कारखान्यांची तपासणी झालेली नाही. त्यामुळे भेसळयुक्त कुल्फीची विक्री होण्याची शक्यता आहे. अन्न व औषध प्रशासनाने कारखान्यांची तपासणी करून कारवाई करावी. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाईची गरज आहे.

थंडगार कुल्फी, की भेसळीचा विषारी गोळा!
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

अहिल्यानगर जिल्ह्यात खाद्यतेलापासून बनवलेली भेसळयुक्त कुल्फी नुकतीच जप्त करण्यात आली. या पार्श्वभूमीवर नाशिकमधील कुल्फीच्या कारखान्यांचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

नाशिकमध्ये कुल्फीचे सुमारे ५० ते ६० लहान-मोठे कारखाने आहेत. मात्र, त्यांची अनेक वर्षांपासून तपासणीच झालेली नसल्याचे वास्तव निदर्शनास आले आहे. त्यामुळे नाशिकमध्येही भेसळयुक्त कुल्फीची विक्री होत असल्याची शक्यता असून, अन्न व औषध प्रशासनाने या कारखान्यांची काटेकोर तपासणी करून नागरिकांच्या जिवाशी खेळणाऱ्यांवर कारवाईची गरज निर्माण झाली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाने गुप्त माहितीच्या आधारे एका मोठ्या गोदामावर धाड टाकली. या कारवाईत तब्बल सोळाशे किलोंहून अधिक भेसळयुक्त कुल्फीचा साठा जप्त करण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे कुल्फीमध्ये दुग्धजन्य पदार्थांऐवजी स्वस्त आणि आरोग्यास घातक खाद्यतेलाचे मिश्रण करून ती तयार केली जात होती. ही भेसळयुक्त साखळी नाशिकपर्यंत पसरलेली असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

शहरात जुने नाशिक, पंचवटी, सातपूर, सिडको आणि नाशिकरोड आदी भागात अंदाजे ५० ते ६० लहान-मोठे कुल्फी उत्पादक कारखाने आहेत. याव्यतिरिक्त शेकडो किरकोळ विक्रेतेही विविध ब्रँड्सच्या नावाने कुल्फी विकतात. नाशिकमध्ये दररोज मोठ्या प्रमाणावर कुल्फीची विक्री होते. मात्र, कारखान्यांमध्ये वापरले जाणारे दूध, मावा, साखर आणि रंग हे अन्न सुरक्षा मानकांनुसार आहेत की नाहीत, याची ठोस पडताळणीच होत नाही. अनेक कारखाने दाट लोकवस्ती आणि अस्वच्छ ठिकाणी असूनही त्यांच्यावर कारवाई होत नाही.

अहिल्यानगरमध्ये जे सापडले ते नाशिकमध्येही असू शकते. दुर्दैवाने नाशिकमध्ये गेल्या अनेक वर्षांत अशा एकाही मोठ्या कारखान्यावर धडक कारवाई झालेली ऐकिवात नाही. केवळ नमुना घेण्याच्या नावाखाली वेळकाढूपणा केला जातो. प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे सामान्य नागरिक आणि विशेषतः लहान मुलांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. जिल्हा प्रशासनाने या प्रकरणी विशेष पथके नेमून सर्व कारखान्यांचे नमुने तातडीने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावेत, अशी मागणी आता जोर धरत आहे.