भगवान परशुरामांचा जयघोष

महाराष्ट्र टाइम्स

नाशिकमध्ये भगवान परशुराम जयंती उत्साहात साजरी झाली. अखिल ब्राह्मण समुदाय आणि विविध समाजातील लोकांनी शोभायात्रेत सहभाग घेतला. त्र्यंबक रोडवरील अखिल मध्यवर्ती ब्राह्मण संस्थेत महोत्सवाची सुरुवात झाली. शोभायात्रा भद्रकाली, मेनरोड, रविवार कारंजा, मालेगाव स्टँडमार्गे पंचवटीतील श्री काळाराम मंदिरात पोहोचली. तेथे भगवान परशुराम आणि भगवान श्रीराम यांच्या भेटीने सोहळ्याची सांगता झाली. त्यानंतर सामुदायिक रामरक्षा पठण, महाआरती आणि महाप्रसाद वाटप करण्यात आले.

भगवान परशुरामांचा जयघोष
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

‘भगवान परशुराम की जय...’, ‘सबका कल्याण हो...’,‘जय श्रीराम.. जय परशुराम...’ असा जयघोष करीत पारंपरिक वेशभूषेत भगवान परशुराम जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेने नाशिककरांचे लक्ष वेधले.

अखिल ब्राह्मण समुदायातील समाजबांधवांसह विविध समाजांतील बंधू-भगिनी आणि लोकप्रतिनिधींनी शोभायात्रेत सहभागी होत सदिच्छा व्यक्त केल्या. सकल ब्राह्मण संस्था, परशुराम प्रतिष्ठान आणि परशुराम जयंती उत्सव समितीतर्फे आयोजित या दोनदिवसीय महोत्सवाचा समारोप रविवारी सायंकाळी पाचला निघालेल्या भव्य शोभायात्रेने झाला.

त्र्यंबक रोडवरील अखिल मध्यवर्ती ब्राह्मण संस्थेत शनिवारी महोत्सवाची सुरुवात झाली. यावेळी ‘श्रीमंत बाजीराव पेशवे आणि युद्धनीती’ या विषयावर इतिहासतज्ज्ञ शांतनू परांजपे यांचे व्याख्यान झाले. पेशव्यांच्या मातुल घराण्याचे नववे वंशज चंद्रशेखर बर्वे यांची प्रमुख उपस्थिती होती. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांना यावेळी ‘समाजभूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले. महोत्सवादरम्यान नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. शहरात ठिकठिकाणी प्रतिमापूजन करून परशुराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. उत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. सचिन पाडेकर, उपाध्यक्ष भूषण जुन्नरे आणि डॉ. दीपाली कुलकर्णी यांच्यासह पदाधिकारी व समाजबांधवांनी सोहळ्याचे संयोजन केले.

भगवान परशुराम-श्रीराम भेट

भद्रकाली मंदिर प्रांगणातून निघालेल्या शोभायात्रेत पारंपरिक वेशभूषेत सहभागी हजारो समाजबांधव सहभागी झाले होते. ढोल-ताशांचा गजर आणि जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. ही शोभायात्रा भद्रकाली, मेनरोड, रविवार कारंजा, मालेगाव स्टँडमार्गे पंचवटीतील श्री काळाराम मंदिरात पोहोचली. तेथे भगवान परशुराम-भगवान श्रीराम यांच्या भेटीने सांगता झाली. हा ऐतिहासिक भक्तिमय सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा होता. यानंतर सामुदायिक रामरक्षा पठण, महाआरती आणि महाप्रसादाचे वाटप झाले.