साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेच्या योगावर रविवारी शहरासह उपनगरांतील बाजारपेठांत खरेदीचा ‘बार’ उडाल्याचे दिसून आले. सकाळी घरोघरी पारंपरिक करा-केळी पूजन, आमरस-पूरणपोळीचा बेत झाल्यावर सायंकाळी पाचनंतर नाशिककर खरेदीसाठी बाहेर पडले. त्यामुळे बांधकाम, वाहने, सोने-चांदी, कपडे, इलेक्ट्रॉनिक्स अशा सर्वच क्षेत्रांत कोट्यवधींची उलाढाल झाली.
आखातातील युद्धाचा काही प्रमाणात फटका बसल्याने बांधकाम क्षेत्रातील खरेदीला कसा प्रतिसाद लाभतो, याबाबत साशंकता होती. मात्र, अनेकांनी प्लॉट, सदनिका व व्यावसायिक गाळ्यांच्या खरेदीचा मुहूर्त साधला. कार, दुचाकींची ‘डिलिव्हरी’ घेण्यासाठी शहरातील वाहन वितरकांची दालने सकाळपासूनच गजबजली होती. इलेक्ट्रॉनिक्स बाजारातही टीव्ही, वॉशिंग मशिन, डिश वॉशर, मायक्रोवेव्ह, कूलर, एसी, फ्रिजसह अन्य गृहोपयोगी वस्तूंना मोठी मागणी होती. यंदा उन्हाचा चटका अधिक असल्याने एसी, कूलर, फ्रिजला वाढती मागणी होती. लॅपटॉप आणि मोबाइल खरेदीसाठीही बाजारपेठेत गर्दी दिसून आली. मेनरोडसह शहर व उपनगरांतील सर्वच बाजारपेठा गर्दीने ओसंडल्या होत्या. अनेक व्यावसायिकांनी खास ऑफर्स जाहीर केल्याने ग्राहकांच्या उत्साहात भर पडली.
साडेतीन हजार कारची ‘डिलिव्हरी’
असंख्य ग्राहकांनी गुढीपाडव्यापासून ‘बुकिंग’ करून ठेवलेली वाहने अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर घरी नेली. शहरात प्रमुख चारचाकी वाहन कंपन्यांची १५, तर दुचाकी कंपन्यांची २० ते २२ दालने आहेत. तेथून दिवसभरात सुमारे दोन हजार कार, तर तीन ते चार हजार दुचाकींची ‘डिलिव्हरी’ देण्यात आली. सीएनजी कार आणि इलेक्ट्रिक दुचाकींनाही चांगली मागणी होती. यंदा प्रीमियम कारला अधिक मागणी होती.
अक्षय्य तृतीयेला पितरांना आंबेरस-पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून आंबे सेवनास प्रारंभ केला जातो. त्यामुळे यंदाही पूरणपोळी-आंबे यंदाही तेजीत होतेच. पण, पारंपरिक मांड्यांनाही मागणी वाढली होती. शहरातील सिडको, नाशिकरोड परिसरात मांडे खरेदीसाठी अक्षरशः रांगा लागल्या होत्या. मात्र, यंदा पुरणपोळी आणि मांड्यांनाही महागाईचा फटका बसला. गेल्या वर्षी ४५ रुपयांना मिळणारा मांडा तब्बल ८० रुपयांवर गेला. पुरणपोळीही ५० रुपयांवर गेली होती.







