नवश्या गणपतीला आंब्यांची आरास

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

सातपूरमध्ये नवश्या गणपतीला आंब्यांची आरास करण्यात आली. औद्योगिक वसाहतीत रस्त्यांच्या साइडपट्ट्यांवर अतिक्रमणे आणि रॅम्पमुळे वाहनचालकांना त्रास होत आहे. दारणा नदीत महिलेने आत्महत्या केली. नव्याने तयार केलेला रस्ता पाईपलाईनसाठी खोदल्याने महापालिकेचा खर्च वाया गेला. मायको रुग्णालयाजवळील स्वच्छतागृहाची तोडफोड झाल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

नवश्या गणपतीला आंब्यांची आरास

सातपूर : शहरातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या नवश्या गणपतीला रविवारी अक्षय्य तृतीयेनिमित्त आंब्यांची आरास करण्यात आली होती. अक्षय्य तृतीयेला आंब्याचे महत्त्व अधिक असल्याने केलेली ही आरास पाहण्यासह दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली होती. पहाटे पाच वाजेला मंदिर ट्रस्टच्या वतीने महाआरती व महापूजा झाली. ट्रस्टचे अध्यक्ष राजू जाधव यांनी भाविकांचे स्वागत केले.

साइडपट्ट्यांवर रॅम्प

सातपूर : सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतींतील रस्त्यांच्या साइडपट्ट्यांवर ठिकठिकाणी अतिक्रमणे झालेली आहेत. अनेक ठिकाणी साइडपट्ट्यांवर चक्क काँक्रिटीकरण करीत रॅम्प करण्यात आल्याने वाहनचालकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकारामुळे रस्ते अरुंद होऊन वाहने चालविताना मोठी कसरत करावी लागत असल्याने साइ़डपट्ट्यांवरील अनधिकृत रॅम्प हटविण्याची मागणी त्रस्त वाहनचालक करीत आहेत.

महिलेची आत्महत्या

नाशिकरोड : दारणा नदीपात्रातील पाण्यात उडी घेत महिलेने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी राहुरीरोड, भगूर येथे घडली. माधुरी मुरलीधर शिंदे (वय ४८, रा. शिवाजीनगर, ठाणे) असे या घटनेत मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, हवालदार जगदाळे या प्रकरणी तपास करीत आहेत.

नवीन रस्ता खोदला

सातपूर : नाशिक महापालिकेकडून सातपूर विभागातील मळे परिसरात गेल्याच वर्षी नव्याने संत सावता महाराज मार्ग या ठिकाणी डांबरीकरण रस्ता तयार करण्यात आला होता. नव्यानेच तयार करण्यात आलेला डांबरी रस्ता पाईपलाईन टाकण्यासाठी खोदण्यात आला. पाईपलाईनचे काम जर कराचे होते, तर डांबरीकरण का करण्यात आले? डांबरी रस्ता खोदण्यात आल्याने महापालिकेचा लाखो रुपयाचा खर्च वाया गेल्या असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

स्वच्छतागृहाची तोडफोड

सातपूर : नाशिक महापालिकेच्या सातपूर विभागातील बांधकाम विभागाने लाखो रुपये खर्च करून मायको रुग्णालयाच्या बाजूला सार्वजनिक स्वच्छतागृहाची उभारणी केली होती. त्याचा वापरही अनेक दिवसांपासून सुरू होता. परंतु, गेल्या काही दिवसांपूर्वी या सार्वजनिक स्वच्छतागृहाची तोडफोड करण्यात आल्याने त्याचा वापर बंद झाला आहे. यामुळे महापालिकेचा लाखो रुपयांचा खर्च वाया गेला असल्याचे मत नागरिक व्यक् करीत आहेत.