कौटुंबिक वादातून सासूला पाजले फिनेल

महाराष्ट्र टाइम्स

नाशिक शहरात कौटुंबिक वादातून एक धक्कादायक घटना घडली. पंचवटीतील अमृतधाम परिसरात एका सुनेने आपल्या सासूला फिनेल पाजले. घरगुती कामावरून झालेल्या वादातून हा प्रकार घडला. या प्रकरणी पोलिसांनी सुनेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सासूची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

shocking incident of daughter in law poisoning mother in law with phenyl

शहरात कौटुंबिक वादातून टोकाची पावले उचलली जाण्याचे प्रमाण वाढत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. पंचवटीतील अमृतधाम परिसरातील युनायटेड इंजिनीअर सोसायटीत एका सुनेने सासूला फिनेल पाजून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली.

घरगुती कामाच्या वादातून झालेल्या या कृत्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सासू उज्ज्वला मोराडे यांनी पंचवटी पोलिस ठाणे गाठून दिलेल्या फिर्यादीची दखल घेत पोलिसांनी त्यांची सून तेजश्री भूषण मोराडे हिच्याविरुद्ध ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. काही दिवसांपासून घरात किरकोळ कारणावरून खटके उडत होते. सकाळी ‘कामवाली बाई कामावर का आली नाही?’ या विषयावरून सासू आणि सून यांच्यात पुन्हा शाब्दिक वाद सुरू झाला. या वादाचे पर्यवसान काही वेळातच मोठ्या भांडणात झाले. संतापलेली सून तेजश्री हिने वादादरम्यान सासूला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करीत फिनेल पाजण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत सासूच्या पोटात फिनेल गेल्याने सासूची प्रकृती बिघडली होती.