लातूर : जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांचा जयघोष करून शहरात बसवेश्वर महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आझाद चौकातून महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. उत्सव समितीच्या वतीने शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
शनिवारी रात्री महात्मा बसवेश्वर चौक रिंग रोड येथील बसवेश्वरांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण करण्यात आले. नंतर भव्य आतषबाजी करण्यात आली. या वेळी आमदार अभिमन्यू पवार, भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अर्चना पाटील चाकूरकर, उपमहापौर ॲड. स्नेहल उटगे, स्थायी समितीचे सभापती सचिन बंडापल्ले, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील-कव्हेकर,हृषीकेश राजे, सत्यवती चेवले, आदिती पाटील-कव्हेकर, काँग्रेसचे प्रदेश सचिव श्रीशैल उटगे आदी उपस्थित होते.
मध्यरात्री महात्मा बसवेश्वर महाविद्यालयासमोरील बसवेश्वरांच्या पुतळ्यास गवळी समाजाच्या वतीने दुग्धाभिषेक करण्यात आला. रविवारी सकाळी महात्मा बसवेश्वरांच्या अश्वारूढ पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.
या वेळी आमदार विक्रम काळे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. दुपारी पाचशे घर मठ येथे बसव जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आझाद चौक ते महात्मा बसवेश्वर कॉलेज येथील बसवेश्वरांच्या पुतळापर्यंत महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यामध्ये मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होते.
महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्यास खासदार डॉ. शिवाजी काळगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या वेळी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष ॲड. किरण जाधव, महापौर जयश्री सोनकांबळे, उपमहापौर स्नेहल उटगे, कैलास कांबळे, विजयकुमार साबदे, दगडूअप्पा मिटकरी यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ॲड. नीलेश मुचाटे, प्रा. भालचंद्र येडवे-पाटील, नितीन मोहनाळे, किरण खोबरे यांनी परिश्रम घेतले.







