बंदुकीचा धाक दाखवत पतीने पत्नीचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना सातपूर परिसरात घडली. श्रमिकनगर भागात मध्यरात्री घडलेल्या या थरारावेळी पिस्तुलाचाही वापर झाल्याने परिसरात खळबळ उडाली होती.
सातपूर पोलिसांत संशयित पतीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंद झाला असून, पोलिसांची पथके ठाणे आणि मुंबईच्या दिशेने रवाना झाली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित अक्षय युवराज पाटील (मूळ रा. सातपूर, सध्या ठाणे) याच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. अक्षय व पीडित तरुणी यांचा काही महिन्यांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. सुरुवातीला सुखाचा वाटणारा हा संसार अक्षयच्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे अल्पावधीतच अडचणीत आल्याचा संशय आहे. अक्षयने पुन्हा गुन्हेगारी मार्गाची निवड केल्याने पत्नीने त्याला सुधारण्याची अनेकदा संधी दिली. मात्र, त्याच्या वर्तनात कोणताही बदल न झाल्याने वैतागलेल्या पत्नीने अखेर माहेरी राहण्याचा निर्णय घेतला होता. त्याबाबत राग अक्षयच्या मनात होता. त्या रागातून अक्षयने मध्यरात्री बदलापूरहून नाशिक गाठले. सासरी येऊन त्याने मोठा गोंधळ घातला. त्याने पिस्तुलाचा धाक दाखवून पत्नीला बळजबरीने चारचाकी वाहनात बसविले आणि तिचे अपहरण करून तो पसार झाला. या प्रकरणी सातपूरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रकाश आहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक गणेशपुरी बुवा तपास करीत आहेत. त्यांचे विशेष पथक संशयिताचा शोध घेण्यासाठी तातडीने मुंबई-ठाणे परिसरात रवाना झाले आहे. दरम्यान, या घटनेत अक्षयने वापरलेले शस्त्र खरे होते का, हे त्याला अटक केल्यानंतरच स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. अक्षयवर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल असल्याची प्राथमिक माहिती आहे.








