रशियाच्या हल्ल्यात युक्रेनमध्ये १६ ठार

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

रशियाने युक्रेनवर गुरुवारी शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ले केले. या हल्ल्यात किमान १६ जणांचा मृत्यू झाला असून ८० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. कीव्हमध्ये एका बालकासह चौघांचा बळी गेला. युक्रेनच्या हवाई संरक्षण यंत्रणांनी अनेक लक्ष्ये निष्फळ ठरवली. मात्र, काही ड्रोन आणि क्षेपणास्त्रे शहरांवर आदळली. या हल्ल्यांमुळे नागरिक भयभीत झाले आहेत.

रशियाच्या हल्ल्यात युक्रेनमध्ये १६ ठार

कीव्ह : रशियाने युक्रेनच्या नागरी भागांवर गुरुवारी शेकडो ड्रोन आणि डझनभर क्षेपणास्त्रांनी दिवसभर भीषण हल्ले केले. या हल्ल्यांत किमान १६ जण ठार, तर ८०हून अधिक जखमी झाले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. भीतीने नागरिक घरांमध्ये दडून बसले होते.

युक्रेनच्या हवाई संरक्षण यंत्रणांनी ७०३ पैकी ६६७ लक्ष्ये निष्क्रिय केल्याचा दावा केला असून, त्यात ६३६ ‘शाहेद’ प्रकारच्या ड्रोनचा समावेश आहे. मात्र, २० ड्रोन आणि १२ क्षेपणास्त्रे २६ ठिकाणी आदळल्याचे लष्कराने म्हटले आहे.

युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये रात्री झालेल्या हल्ल्यात एका बालकासह चौघे ठार झाले, तर ५० जण जखमी झाले. या शहरात १७ अपार्टमेंट इमारती, १० खासगी घरे, एक हॉटेल, कार्यालय केंद्र, पेट्रोल पंप, शॉपिंग मॉल आदींना लक्ष्य करण्यात आले. यासह दक्षिणेकडील ओडेसा, मध्यवर्ती भागातील द्निप्रो, दक्षिणेकडील झापोरिझ्झिया या भागांना लक्ष्य करण्यात आले. ‘अशा प्रकारचे हल्ले हे युद्धगुन्हे असून ते तातडीने थांबवले पाहिजेत. दोषींना जबाबदार धरले गेले पाहिजे,’ असे युक्रेनचे परराष्ट्रमंत्री आंद्री सिबिहा यांनी ‘एक्स’वर म्हटले आहे.