पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तय्यबा या दहशतवादी संघटनेचा सहसंस्थापक आमीर हमझा (वय ६६) याच्यावर लाहोरमध्ये अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गोळ्या झाडल्या. हमझा याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. भारतासह जगभरातील अनेक दहशतवादी हल्ल्यांमागे त्याचा हात होता.
गेल्या वर्षी मे महिन्यातही हमझा याच्यावर लाहोरमधील त्याच्या निवासस्थानाबाहेर अशाच प्रकारे गोळीबार करण्यात आला होता.
हमझा हा लष्कर-ए-तय्यबाचा प्रमुख हाफीज सईद याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा प्रभावशाली नेता मानला जातो. पंजाब प्रांतातील गुजरानवाला येथे १० मे १९५९ रोजी त्याचा जन्म झाला.
‘अफगाण जिहाद’मध्ये सहभाग घेतल्यानंतर त्याने १९८५-८६ दरम्यान सईदसोबत लष्कर-ए-तय्यबाची स्थापना केली. भारतातील अनेक दहशतवादी कारवायांमध्ये त्याचा सहभाग आहे. २००५ मध्ये बेंगळुरूमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सवरील हल्ल्याच्या कटात त्याचा सहभाग असल्याचेही सांगितले जाते.
कराची : पाकिस्तानी नौदलाने स्थानिक पातळीवर विकसित केलेल्या जहाजावरून मारा करणाऱ्या जहाजविरोधी क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी झाली असून हे क्षेपणास्त्र विस्तारित पल्ल्यावर अचूक लक्ष्यभेद करण्यास सक्षम आहे, असे पाकिस्तानी लष्कराने गुरुवारी सांगितले. या क्षेपणास्त्राची याआधीची चाचणी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये घेण्यात आली होती. ही शस्त्रप्रणाली समुद्रावरील आणि जमिनीवरील दोन्ही लक्ष्ये ‘उच्च अचूकतेने’ भेदण्यास सक्षम असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे.








