मोठे मतभेद अद्याप कायम

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

चीनने इराणला होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजांना मुक्तपणे जाण्याची परवानगी देण्याचे आवाहन केले आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात पाकिस्तानच्या मध्यस्थीने करार होण्याच्या दिशेने काही प्रगती झाली आहे. मात्र, इराणच्या अणु महत्त्वाकांक्षेसह अनेक मोठे मतभेद अजूनही कायम आहेत. अमेरिकेने इराणला युद्धाचा इशारा दिला आहे. इटलीच्या पंतप्रधानांवर ट्रम्प यांनी टीका केली आहे.

मोठे मतभेद अद्याप कायम

बीजिंग : ‘होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजांना मुक्त आणि सुरक्षितपणे जाण्यास स्वातंत्र्य द्या’, असे आवाहन चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी इराणला केले आहे. अमेरिकेशी युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने या महत्त्वाच्या जलमार्गावर दबाव टाकण्यास सुरुवात केल्यापासून चीनने असे आवाहन केल्याची ही पहिलीच वेळ आहे. वांग यी यांनी बुधवारी इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांच्याशी दूरध्वनीवर संवाद साधताना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून आंतरराष्ट्रीय नौवहनाच्या स्वातंत्र्याची आणि सुरक्षिततेची हमी मागितली.

‘इराण आणि अमेरिका यांनी पाकिस्तानच्या मध्यस्थीने करार करण्याच्या दिशेने काही प्रगती केली आहे. मात्र, दोन आठवड्यांच्या युद्धविरामाचा अर्ध्याहून अधिक कालावधी उलटूनही इराणच्या अणुमहत्त्वाकांक्षेसह अनेक मोठे मतभेद कायम आहेत’, असे एका वरिष्ठ इराणी अधिकाऱ्याने गुरुवारी सांगितले.

पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असिम मुनीर यांनी बुधवारी इराणला भेट दिली. ‘पाकिस्तानी लष्करप्रमुखांच्या दौऱ्याने अमेरिका आणि इराणमधील काही क्षेत्रांतील मतभेद कमी झाले आहेत, मात्र अणुक्षेत्राबाबतचे मूलभूत मतभेद अद्यापही कायम आहेत... इराणच्या समृद्ध युरेनियमचे भवितव्य आणि इराणच्या अणु निर्बंधांचा कालावधी हे अत्यंत वादग्रस्त मुद्दे आहेत, ज्यांवर अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. युद्धविरामाच्या विस्तारासाठी आणि दुसऱ्या फेरीच्या चर्चेसाठी अधिक आशा निर्माण झाल्या आहेत’, असे इराणच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

‘चर्चेच्या दुसऱ्या फेरीच्या

तारखा निश्चित नाहीत’

इस्लामाबाद : पाकिस्तानने गुरुवारी सांगितले की, अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चेच्या दुसऱ्या फेरीसाठी अद्याप कोणत्याही तारखा निश्चित करण्यात आलेल्या नाहीत. पाकिस्तानी शिष्टमंडळाने इराणी नेतृत्वासह प्रादेशिक नेत्यांशी केलेल्या ताज्या संपर्कानंतर चर्चेची आणखी एक फेरी शक्य असल्याचे मानले जात आहे. या पार्श्वभूमीवर पाकच्या परराष्ट्र कार्यालयाचे प्रवक्ता ताहिर अंद्राबी यांनी हे वक्तव्य केले. त्यांनी चर्चेच्या दुसऱ्या फेरीची शक्यता नाकारणे टाळले.

अमेरिकेचा इराणला इशारा

वॉशिंग्टन : ‘इराणने युद्धविरामाचा करार करावा, अन्यथा आम्ही कठोर मार्गाचाही अवलंब करू शकतो’, असा इशारा अमेरिकेचे संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांनी गुरुवारी इराणला दिला. पेंटागॉनमध्ये पत्रकारांशी बोलताना हेगसेथ म्हणाले, ‘अखेरीस, त्यांना आमच्याशी वाटाघाटी करून करार करावाच लागेल.’ इराणकडे कधीही अण्वस्त्र नसेल याची अमेरिका खात्री करेल, असेही ते म्हणाले.

ट्रम्प यांची इटलीच्या

पंतप्रधानांवर टीका

मिलान : इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी या युरोप आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील सेतू ठरतील, असे मानले जात होते. मात्र, चौदावे पोप लिओ यांच्यावर टीका केल्यानंतर ट्रम्प यांनी आपला रोष मेलोनी यांच्यावर व्यक्त केला आहे.

ट्रम्प यांनी पोप यांच्यावर केलेला शाब्दिक हल्ला अस्वीकारार्ह ठरवल्याने आणि इराणविरुद्धच्या युद्धाला पाठिंबा न दिल्याने ट्रम्प यांनी मेलोनी यांना लक्ष्य केले. इटलीचे आघाडीचे दैनिक ‘कोरिएरे देला सेरा’ला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प म्हणाले, ‘मला वाटले होते त्यांच्यात (मेलोनी) धाडस आहे. मात्र, मी चुकीचा होतो.’ दरम्यान, मेलोनी यांनी ट्रम्प यांच्या टीकेला थेट उत्तर दिलेले नाही.