कोलकाता : ‘आमार सोनार बांगला , आमी तोमाय भालोबाशी...’. बंगालच्या फाळणीला विरोध म्हणून रवींद्रनाथ टागोर यांनी सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वी रचलेले हे गीत आजही बंगाली अस्मिमेचे प्रतीक मानले जाते. हे गीत सध्या बांगलादेशचे राष्ट्रगीत असले तरी ‘सोनार बांगला’ला उजळा दिल्याशिवाय पश्चिम बंगालची निवडणूक कधी पूर्ण होत नाही. यंदा राज्याची विधानसभा निवडणूक अशीच प्रतीके, प्रतिमा आणि टोकदार अस्मितेच्या हिंदोळ्यावर अधिक वेगाने झुलत आहे.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने १५ कलमी संकल्पपत्र नुकतेच प्रकाशित केले. ‘सोनार बांगला’च्या संकल्पाभोवती हा जाहीरनामा गुंफण्यात आला आहे. त्यात समान नागरी कायद्यासह अन्य योजनांची आश्वासने आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीतही भाजपने ‘आमार सोनार बांगला बनाबो’ असे घोषवाक्य देत बंगालला गतवैभव प्राप्त करून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यावेळी तृणमूल काँग्रेसने मात्र ‘जय बंगाल’ची घोषणा दिली होती. ‘जय श्रीराम’च्या घोषणेला प्रत्युत्तर म्हणून प्रादेशिक अस्मितेचे कार्ड वापरणाऱ्या तृणमूल काँग्रेसने यंदा बंगाली अस्मितेला अधिक धार दिली आहे. ‘जोतोई कोरो हमला, आबार जितबे बांगला’ (कितीही हल्ले करा, यावेळीही जिंकणार बंगालच) या प्रचारगीतातून तृणमूल काँग्रेसने प्रचाराचा झंझावात निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. कोलकातासह परिसरातील सर्व ठिकाणी हे प्रचारगीत वरचेवर ऐकू येते. तृणमूल काँग्रेसच्या प्रचाराच्या बॅनर्सवर हे घोषवाक्य ठसठशीतपणे दिसते.
अस्मिता आणि प्रतीकांसोबत प्रतिमेचा पुरेपूर वापर या निवडणूक प्रचारात दिसून येतो. कोलकातामधील (पान ६वर)









