मथुरा : वृंदावन येथील यमुना नदीत झालेल्या नौका दुर्घटनेतील शेवटचा बेपत्ता भाविक पंकज मल्होत्रा (४०) यांचा मृतदेह आठवडाभरानंतर सापडला आहे. यासह या दुर्घटनेतील एकूण मृतांची संख्या १६ झाली आहे. पंजाबच्या फाजिल्का येथील रहिवासी असलेले मल्होत्रा हिमाचल प्रदेशात मॅनेजर म्हणून कार्यरत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीव्र शोध मोहिमेनंतर पाणीघाट पुलाखाली हा मृतदेह आढळला. दुर्घटनेतील जखमी आठ भाविकांना उपचारांनंतर घरी सोडण्यात आले आहे.
तरुणाची आत्महत्या
एटा (उत्तर प्रदेश) : बहिणीच्या लग्नाचा खर्च कसा भागवायचा, या विवंचनेतून सतीशकुमार (३०) या तरुणाने गुरुवारी आत्महत्या केली. मारहरा पोलिस ठाण्यांतर्गत असलेल्या फतेहपूर माफी गावात ही घटना घडली. घरातील इतर सदस्य शेतात गहू कापणीसाठी गेले असताना सतीशने गळफास घेतला. १९ एप्रिल रोजी त्याच्या बहिणीचे लग्न असून वडील राकेशकुमार लग्नाच्या पत्रिका वाटप करण्यात व्यस्त होते. आर्थिक तणावातून हे पाऊल उचलल्याचे पोलिसांनी सांगितले.
सुमार भाषांतराबद्दल चिंता
नवी दिल्ली : कायदेशीर मदत प्रकरणांमध्ये अपीलासाठी सादर केलेल्या कागदपत्रांच्या सुमार दर्जाच्या भाषांतराबद्दल सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी तीव्र चिंता व्यक्त केली. न्यायमूर्ती संजय करोल आणि एन. कोटिश्वर सिंग यांच्या खंडपीठाने देशातील सर्व उच्च न्यायालयांना या विषयाची गंभीर दखल घेण्याचे आदेश दिले आहेत. पुढील चार आठवड्यांत यावर निर्णय घेण्याचे निर्देश देऊन, खंडपीठाने दस्तऐवज भाषांतरासाठी ‘मानक कार्यप्रणाली’ मंजूर केली आहे.
पाच आमदार निलंबित
चंडीगड : गेल्या महिन्यात झालेल्या राज्यसभा निवडणुकीत पक्षादेश डावलून मतदान केल्याप्रकरणी हरयाणा काँग्रेसने पाच आमदारांना निलंबित केले आहे. शॅली चौधरी, रेणू बाला, मोहम्मद इलियास, महंमद इस्रायल आणि जर्नेल सिंग अशी या आमदारांची नावे आहेत. पक्षविरोधी कारवाया आणि शिस्तभंगाची गंभीर दखल घेत प्रदेशाध्यक्ष राव नरेंद्र सिंग यांनी ही कारवाई केली. या पाचही आमदारांचे प्राथमिक सदस्यत्व तत्काळ प्रभावाने रद्द करण्यात आले आहे.
हत्तीच्या हल्ल्यात एक ठार
सुरजपूर (छत्तीसगड) : सुरजपूर जिल्ह्यातील कोटबहरा गावाजवळ रानटी हत्तीने तुडवल्यामुळे केशव (२८) या तरुणाचा मृत्यू झाला. बुधवारी सायंकाळी कामावरून घरी परतत असताना त्याचा हत्तीशी आमना-सामना झाला. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी निदर्शने केली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. परिसरात हत्तींचा वावर वाढल्याने वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.







