भंडारा : मोहफुले वेचण्यासाठी जंगलात गेलेल्या एका ५२ वर्षीय महिलेचा वन्यजीवाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी तुमसर तालुक्यातील धनेगाव येथे घडली. साधना सीताराम उईके असे मृत महिलेचे नाव आहे. साधना उईके या शुक्रवारी सकाळी ९.३० वाजतादरम्यान गावाशेजारील शेतशिवारात मोहफुले वेचण्यासाठी गेल्या होत्या. मात्र, दुपार उलटूनही घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. गावाजवळील जंगल शिवारात त्यांचा छिन्नविच्छिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला. साधना यांच्यावर नेमक्या कोणत्या वन्यजीवान हल्ला केला याविषयी संभ्रमक आहे. हल्ला करणारा प्राणी वाघ होता की बिबट्या, हे वनविभागाच्या पंचनाम्यानंतर आणि शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. मागील काही दिवसांत मानव-वन्यजीव संघर्ष शिगेला पोहचला आहे.





