खुनातील आरोपी २४ वर्षांनी अटकेत

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

तंबाखू मागितल्याने झालेल्या वादात एका व्यक्तीचा खून झाला. या गुन्ह्यातील आरोपी २४ वर्षांपासून फरार होता. राजगड पोलिसांनी वेषांतर करून महाड परिसरातील डोंगरात त्याला पकडले. हिऱ्या उर्फ हिरामण शिवराम पवार असे आरोपीचे नाव आहे. २००२ साली हा गुन्हा घडला होता. पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्या मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली.

arrest of murder accused after 24 years successful action by rajgad police

भोर : तंबाखू खाण्यास मागितल्याच्या कारणावरून झालेल्या मारहाणीत हातातील काठीने मारून एकाचा खून झाला. या खुनातील फरारी आरोपी २४ वर्षांनी पकडण्यात पोलिसांना यश आले. राजगड पोलिसांनी वेषांतर करून या आरोपीला बेड्या ठोकल्या.

हिऱ्या उर्फ हिरामण शिवराम पवार (वय ४३, रा. कलकतवाडी, ता. महाड, जि. रायगड) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणात २४ वर्षांपूर्वी बाबूराव रामभाऊ मरगळे (रा. आंबेगाव खुर्द, ता. राजगड) यांचा खून झाला होता. या प्रकरणी २४ नोव्हेंबर २००२ रोजी गुन्हा नोंद झाला होता. आरोपी संपर्काचे कोणतेही साधन वापरत नसल्यामुळे सापडत नव्हता. पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्या ‘पाहिजे फरार आरोपी शोध’ या मोहिमेअंतर्गत या आरोपीचा शोध घेण्याचे काम राजगड पोलिसांनी सुरू केले. सहायक पोलिस निरीक्षक किशोर शेवते यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार प्रदीप कुदळे व हवालदार सोमेश राऊत यांनी महाड परिसरातील डोंगरात वेषांतर करून आरोपीला अटक केली.