हांडेवाडीत अतिक्रमण निरीक्षकाला मारहाण

महाराष्ट्र टाइम्स

हांडेवाडी येथे महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी कारवाईदरम्यान भाजी विक्रेत्यांनी सहायक निरीक्षकाला मारहाण केली. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. कारवाईला विरोध करत एकाने निरीक्षकाच्या गाडीची काच फोडली. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.

assault on encroachment inspector by vegetable vendors in handewadi

हडपसर परिसरातील हांडेवाडी येथे महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी कारवाईदरम्यान तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. भाजी विक्रेत्यांनी सहायक निरीक्षकाला शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील सहायक निरीक्षक अमोल लावंड यांनी या संदर्भात तक्रार दिली असून, त्यानुसार हांडेवाडी येथे राहणाऱ्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये चार महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (१६ एप्रिल) सायंकाळी सातच्या सुमारास महापालिकेच्या पथकाकडून हांडेवाडी परिसरात भाजी विक्रेत्यांविरूद्ध अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविण्यात येत होती.

या वेळी संबंधित विक्रेत्यांनी कारवाईस विरोध करून लावंड यांच्याशी हुज्जत घातली. ‘महिलांशी गैरवर्तन केले, महिलांना धक्काबुक्की केली’ असा आरोप करून लावंड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची धमकीही देण्यात आली. यानंतर परिस्थिती अधिक चिघळली आणि अतिक्रमण कारवाईला विरोध करत एका व्यक्तीने लावंड यांच्या वाहनाची काच फोडल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या घटनेत सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विष्णू देशमुख करत आहेत.