मेरिकी अवकाश संशोधन संस्था ‘ नासा ’च्या ‘आर्टेमिस २’ मोहिमेअंतर्गत तीन अमेरिकी अंतराळवीर- रीड वाईजमन, व्हिक्टर ग्लोव्हर, ख्रिस्तिना कोच आणि कॅनडाचे अंतराळवीर जेरेमी हॅन्सन चांद्रपरिक्रमा पूर्ण करून शनिवारी (भारतीय प्रमाणवेळेनुसार ११ एप्रिलला पहाटे पाच वाजून ३७ मिनिटांनी) पृथ्वीवर सुखरूप पोचले. दहा दिवसांच्या या मोहिमेद्वारे त्यांनी अवकाशयुगाच्या नव्या पर्वाची सुरुवात केली. मोहिमेची यशस्वी सांगता झाल्यावर अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'आता पुढील पाऊल मंगळाकडे' अशी प्रतिक्रिया दिली. या प्रतिक्रियेतच आर्टेमिस मोहिमांचे सार दडले आहे.
याआधी १९७२ मध्ये अपोलो १७ या मानवी मोहिमेने चंद्राला भेट दिली होती. त्यानंतर ५३ वर्षांनी चंद्राच्या कक्षेत यशस्वी मानवी मोहीम राबवून अमेरिकेने आपण आजही अवकाश तंत्रज्ञानात महासत्ता आहोत, हे जगाला दाखवून दिले. अपोलो मोहिमांना पार्श्वभूमी होती, सोव्हिएत रशिया विरुद्धच्या शीतयुद्धाची. १९५७ पासून सुरू झालेल्या अवकाश युगाच्या पहिल्या टप्प्यात सोव्हिएत रशिया सातत्याने अमेरिकेच्या वरचढ ठरला होता. या अवकाश स्पर्धेचा कळस गाठला गेला, अपोलो मोहिमांमधून. प्रत्यक्ष मानवाला (अमेरिकी नागरिकाला) चंद्राच्या जमिनीवर उतरवून पुन्हा पृथ्वीवर सुखरूप परत आणण्याची किमया अमेरिकेने साधली आणि या स्पर्धेचा एक प्रकारे अंतिम निकाल लावला.
नव्वदच्या दशकात सोव्हिएत रशियाचे विघटन झाले आणि शीतयुद्धासोबत अवकाश स्पर्धाही थंडावली. तांत्रिक आणि वैज्ञानिक महानता सिद्ध करण्यासाठी अपोलो मोहिमांवर होणाऱ्या अब्जावधी डॉलरच्या अमाप खर्चापेक्षा नियमितपणे पृथ्वीभोवतीच्या कक्षेला भेट देऊन भविष्यवेधी संशोधन करण्याचे धोरण अमेरिकेने स्वीकारले आणि अपोलो मोहिमांची समाप्ती होऊन ‘नासा’चा ‘स्पेस शटल’ आणि आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाचा कार्यक्रम सुरू झाला. चंद्रावर माणूस पाठवून चंद्राविषयी आपल्याला जेवढे ज्ञान मिळवणे शक्य होते, तेवढे आपण मिळवले असल्याने आता चंद्रावर मोठ्या खर्चाच्या मानवी मोहिमा पाठवण्याऐवजी मानवरहित रोबोटिक मोहिमा पाठवण्याचा पर्याय स्वीकारला गेला. त्यामुळे सुमारे चार दशके अमेरिकेने चंद्रावर पुन्हा माणूस पाठवण्याचा विचार केला नाही.
एकविसाव्या शतकात मात्र, जागतिक पातळीवर भूराजकीय स्थिती बदलू लागली. १९७० च्या दशकाच्या तुलनेत विज्ञान तंत्रज्ञानातही मोठा विकास झाला. २००८ मध्ये भारताच्या ‘चांद्रयान १’ मोहिमेमधून भारतीय आणि ‘नासा’च्या उपकरणांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाणी असल्याचा ऐतिहासिक शोध लावला. या शोधामुळे जगातील सर्व अवकाशसत्तांचे लक्ष पुन्हा चंद्राकडे वेधले गेले. चंद्रावर कायमस्वरूपी मानवी तळ उभारून त्याचा उपयोग संशोधनासाठी, तसेच सूर्यमालेतील मोहिमांसाठी ‘थांबा’ म्हणून करण्याच्या कल्पना पुढे येऊ लागल्या. सौरवादळांमुळे चंद्राच्या मातीत अब्जावधी वर्षांमध्ये साठलेला हीलियम ३ हा भविष्यातील ऊर्जास्रोत मिळवण्यासाठीच्याही योजना आखल्या जाऊ लागल्या. चंद्राच्या या वैशिष्ट्यांचा लाभ त्यांनाच मिळू शकेल, जे प्रत्यक्ष चंद्रावर मानवी मोहिमा पाठवू शकतील.
दरम्यानच्या काळात अमेरिकेसमोर रशियाऐवजी चीनचे मोठे आव्हान उभे राहिले. चीनने अत्यंत कमी वेळात आपला अवकाश कार्यक्रम वेगाने विकसित करत चंद्राच्या पृथ्वीवरून न दिसणाऱ्या बाजूवर आणि अगदी मंगळावर आपली याने उतरवली. स्वतःचे अवकाश स्थानक विकसित करून त्यावर अंतराळवीरांच्या भेटीही सुरू झाल्या. २०३० पर्यंत चंद्रावर चिनी नागरिक पाठवण्याचा संकल्पही जाहीर केला. चीनची या क्षेत्रातील प्रगती पाहता, चीन हे लक्ष गाठू शकेल, याबाबत अमेरिकेच्या तज्ज्ञांनाही शंका नव्हती. तसे झाले तर अमेरिकेच्या वर्चस्वासाठी ही धोक्याची घंटा ठरू शकते. अमेरिकेने २०३० च्या आधीच आर्टेमिस मोहिमांमधून टप्प्याटप्प्याने पुन्हा चंद्रावर उतरण्याची योजना आखली. या मोहिमांमधून प्रथमच महिला आणि कृष्णवर्णीय अंतराळवीरांना चंद्राच्या भूमीवर पाठवण्याचा मानसही जाहीर केला.
आर्टेमिस मोहिमांसाठी नव्या तंत्रज्ञानाच्या साह्याने स्पेस लाँच सिस्टीम (एसएलएस) हे महाकाय रॉकेट आणि 'ओरायन' हे मानवी अवकाशयान ‘नासा’तर्फे विकसित करण्यात आले. डिसेंबर २०२२ मध्ये ‘आर्टेमिस १’ या मोहिमेतून या यंत्रणेची मानवरहित यशस्वी चाचणी घेण्यात आली. आर्टेमिस १ यान चंद्राच्या कक्षेत जाऊन पुन्हा सुखरूप परतल्यावर ‘आर्टेमिस २’ या मानवी मोहिमेची तयारी सुरू झाली. तांत्रिक कारणांमुळे मोहिमेची नियोजित वेळ अनेकदा पुढे ढकलण्यात आली. अखेर भारतीय प्रमाणवेळेनुसार दोन ते ११ एप्रिल दरम्यान ही मानवी चांद्रमोहीम यशस्वीपणे पार पडली.
पाच दशकांनंतर या मोहिमेतील चार अंतराळवीरांनी चंद्राला वळसा घालून अवकाश तंत्रज्ञानातील नव्या युगाचा प्रारंभ केला. या अंतराळवीरांनी त्यांना ठरवून दिलेली सर्व वैज्ञानिक उद्दिष्टे पूर्ण केली. सहा एप्रिलच्या मध्यरात्री ‘ओरायन’ अवकाशकुपीने अपोलो १३ मोहिमेचा विक्रम मोडत पृथ्वीपासून ४००१७१ किलोमीटरचे अंतर पार केले. त्यानंतर चार अंतराळवीरांचा चंद्राच्या पृथ्वीवरून न दिसणाऱ्या बाजूने प्रवास सुरू झाला. सात एप्रिलच्या पहाटे चार वाजून ३० मिनिटांनी अवकाशकुपीचा चंद्रापासून सर्वांत कमी म्हणजे ६५४५ किलोमीटर अंतरावरून प्रवास झाला. त्यानंतर दोन मिनिटांनी कुपी पृथ्वीपासून ४०६७७१ किलोमीटर इतक्या सर्वाधिक अंतरावर पोचली. या काळात चंद्रापलीकडे गेल्यामुळे कुपीचा पृथ्वीवरील केंद्राशी सुमारे चाळीस मिनिटे संपर्क तुटला होता.
अंतराळवीरांनी सलग सात तास अखंड निरीक्षणे नोंदवून चंद्राचे अनेक अज्ञात पैलू समोर आणले. चंद्राच्या पृथ्वीवरून न दिसणाऱ्या बाजूवरून प्रवास करताना त्यांनी त्यावरील विवरे, डोंगर, दऱ्या, लाव्हाचे प्राचीन प्रवाह यांचे छायाचित्रण केले. चंद्रावरील भूरचनांचे मानवी डोळ्यांना दिसणारे रंग, तेजस्विता, तपशील यांच्या नोंदी घेतल्या. या प्रवासादरम्यान त्यांना चंद्राच्या क्षितिजावर पृथ्वी मावळताना आणि दुसऱ्या बाजूने पुन्हा उगवतानाचे दृश्य दिसले. या मोहिमेत सर्वांत उत्कंठावर्धक निरीक्षण ठरले ते सूर्यग्रहणाचे. अंतराळवीरांनी सुमारे तासभर खग्रास सूर्यग्रहणाचा अनुभव घेतला. या काळात त्यांनी सूर्याचे वातावरण म्हणजे करोनाच्या नोंदी घेतल्या. चंद्राच्या अंधाऱ्या भागावरून चंद्रावरील अशनीपाताच्या प्रकाशमान घटनाही अंतराळवीरांनी टिपल्या.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर माणसाला प्रत्यक्ष उतरवून तिथे दीर्घ काळ वसाहत निर्माण करणे, हे ‘नासा’चे उद्दिष्ट आहे. त्यासाठी २०२७ मध्ये ‘आर्टेमिस ३’ मोहिमेतून डॉकिंगचा प्रयोग आणि २०२८ मध्ये ‘आर्टेमिस ४’ मोहिमेतून प्रत्यक्ष चंद्राच्या भूमीवर मानवी मोहीम राबवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मात्र, त्यासाठी आवश्यक यंत्रणा अद्याप सज्ज नसल्याने हे लक्ष्य वेळेत गाठले जाईल का, याबाबत शंका आहे. चंद्रावर तळ स्थापन झाला, तरी ते अमेरिकेचे अंतिम लक्ष्य नाही. मंगळावर मानवी मोहीम आखण्यासाठी चीनशी स्पर्धा करत वेळ गाठण्याची कसरत अमेरिकेला करावी लागणार आहे. या चित्रात सध्या भारत नसला, तरी पुढील दशकात या स्पर्धेत भारताचाही प्रवेश झालेला असेल. चालू दशकाच्या अखेरीस भारताचा ‘गगनयान’ कार्यक्रम नियमित करण्याची भारतीय अवकाश संशोधन संस्था- इस्रोची योजना आहे. २०३५ पर्यंत भारतीय अंतरिक्ष स्टेशनची निर्मिती आणि २०४० पर्यंत चंद्रावर भारतीय नागरिकाला पाठ्वण्याचा संकल्प ‘इस्रो’ने जाहीर केला आहे.





