गोलंदाजांच्या सांघिक अपयशाचा फटका

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांची कामगिरी निराशाजनक ठरली आहे. जसप्रीत बुमराहसह सर्वच गोलंदाज विकेट घेण्यात अपयशी ठरत आहेत. प्रशिक्षक माहेला जयवर्धने यांनी यावर चिंता व्यक्त केली आहे. प्रतिस्पर्ध्यांच्या फलंदाजांना रोखण्यात गोलंदाजांना यश येत नाहीये. यावर संघाने लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. बुमराहची तंदुरुस्ती आणि नशिबाची साथ यावरही जयवर्धने यांनी भाष्य केले.

bowlers failure leads to mumbai indians defeat

मुंबई : आयपीएल टी-२० क्रिकेटच्या नव्या मोसमात जसप्रीत बुमराह सलग पाचव्या सामन्यात विकेट घेण्यात अपयशी ठरला; मात्र डावाच्या सुरुवातीच्या षटकातच नव्हे तर मोक्याच्या वेळी विकेट घेण्यात सर्वच गोलंदाज अपयशी ठरत आहेत, अशी टिप्पणी मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक माहेला जयवर्धने यांनी गुरुवारी रात्री केली.

जवळपास दोनशे धावांचे आव्हान पार करताना पंजाब किंग्जला फारसे प्रयास पडले नाहीत. सुरुवातीच्या विकेटनंतर प्रभसिमरनसिंग आणि श्रेयस अय्यरने आपल्या संघाला सहज विजय मिळवून दिला. ‘खेळाच्या काही भागात आमची कामगिरी चांगली होत आहे; पण प्रतिस्पर्ध्यांच्या फलंदाजांचा पूर्ण कस पाहण्यात आमच्या गोलंदाजांना अपयश आले. या प्रश्नाकडे आम्हाला लक्ष द्यावे लागणार आहे,’ अशी कबुली जयवर्धने यांनी दिली.

‘बुमराह चांगली गोलंदाजी करीत आहे; मात्र पॉवरप्लेमध्ये आम्ही त्याच्यावर जास्त दडपण आणण्यास तयार नाही. बुमराहची क्षमता प्रत्येक प्रतिस्पर्धी जाणतो. त्यामुळे त्याच्या गोलंदाजीवर ते जास्त धोका घेणार नाहीत. आम्हाला विकेट घेण्यात अपयश येत आहे. त्या प्रश्नावर मात करावीच लागेल,’ असेही ते म्हणाले.

जसप्रीत बुमराहचा विकेट दुष्काळ हा सूर हरपल्यामुळे नव्हे तर अनेक कारणामुळे असल्याचेही जयवर्धने यांनी सांगितले. ‘वर्ल्ड कपनंतर दाखल झालेला बुमराह पूर्ण तंदुरुस्त नव्हता. त्यामुळे त्याला पूर्ण लयीमध्ये येण्यास आम्ही वेळ दिला. काही सामन्यापासून तो वेगाने चेंडू टाकत आहे. काही वेळा नशिबाची साथही गरजेची असते. त्याने विकेट घेण्यास सुरुवात केल्यावर त्याला रोखणे कठीण जाईल. आमच्या संघाची धुरा पूर्णपणे त्याच्यावर अवलंबून नाही. आमच्या संघातील अन्य गोलंदाजही दर्जेदार आहेत. एकमेकांच्या साथीत चांगली कामगिरी होण्याची गरज आहे,’ असे जयवर्धने यांनी जणू खेळाडूंना सुनावले.