कठोर निर्णय लवकरच?

Contributed byम. टा. विशेष क्रीडा प्रतिनिधी|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाची कामगिरी चिंताजनक आहे. गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीत संघ अपयशी ठरत आहे. जसप्रीत बुमराहलाही विकेट मिळत नाहीये. सलग पराभवांमुळे कर्णधार हार्दिक पंड्याला कठोर निर्णय घेण्याची गरज भासत आहे. संघाला लवकरच काही मोठे बदल करावे लागतील, जेणेकरून संघाची कामगिरी सुधारेल.

कठोर निर्णय लवकरच?

मुंबई : आयपीएल टी-२० क्रिकेटच्या नव्या मोसमात जसप्रीत बुमराह सलग पाचव्या सामन्यात विकेट घेण्यात अपयशी ठरला; मात्र डावाच्या सुरुवातीच्या षटकातच नव्हे तर मोक्याच्या वेळी विकेट घेण्यात सर्वच गोलंदाज अपयशी ठरत आहेत, अशी टिप्पणी मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक माहेला जयवर्धने यांनी गुरुवारी रात्री केली. जवळपास दोनशे धावांचे आव्हान पार करताना पंजाब किंग्जला फारसे प्रयास पडले नाहीत. सुरुवातीच्या विकेटनंतर प्रभसिमरनसिंग आणि श्रेयस अय्यरने आपल्या संघाला सहज विजय मिळवून दिला. ‘खेळाच्या काही भागात आमची कामगिरी चांगली होत आहे; पण प्रतिस्पर्ध्यांच्या फलंदाजांचा पूर्ण कस पाहण्यात आमच्या गोलंदाजांना अपयश आले. या प्रश्नाकडे आम्हाला लक्ष द्यावे लागणार आहे,’ अशी कबुली जयवर्धने यांनी दिली. ‘बुमराह चांगली गोलंदाजी करीत आहे; मात्र पॉवरप्लेमध्ये आम्ही त्याच्यावर जास्त दडपण आणण्यास तयार नाहीत. बुमराहची क्षमता प्रत्येक प्रतिस्पर्धी जाणतो. त्यामुळे त्याच्या गोलंदाजीवर ते जास्त धोका घेणार नाहीत. एखादाच गोलंदाज विकेट घेत नाही, असे मी तरी बोलणार नाही. आम्हाला विकेट घेण्यात अपयश येत आहे. त्या प्रश्नावर मात करावीच लागेल,’ असेही त्यांनी नमूद केले.

‘मुंबई’ संघाचे गोलंदाजीत अपयश : पाच सामन्यांत मिळून केवळ १८ विकेट, पाच सामन्यांत मुंबई संघाविरुद्ध एकूण ९७२ धावा, मुंबईच्या गोलंदाजांची इकॉनॉमी रेट १०.२६, मुंबई संघाच्या गोलंदाजांची सरासरी ३०.८६.

सलग चौथ्या पराभवानंतर मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार हार्दिक पंड्याने कठोर निर्णय घेण्याबाबत विचार करावा लागणार, अशी टिप्पणी केली. हार्दिक कोणाकडे नेमके लक्ष वेधत आहे, याची चर्चा सुरू झाली आहे. त्यातच हार्दिकने जसप्रीत बुमराहकडून झेल सुटल्यावर दिलेली प्रतिक्रियाही चर्चेत आली आहे.

‘नेमके काय करायला हवे, याकडे आता आम्हाला लक्ष द्यायला हवे. आम्ही कठोर निर्णय घ्यायला हवेत की जे काही सुरू आहे तेच कायम ठेवून परिस्थिती बदलेल, अशी आशा करायची, याबाबतही ठरवावे लागणार आहे. काही प्रश्नांची उत्तरे सोपी नाहीत; पण त्यास सामोरे जावेच लागेल. काही निर्णय संघव्यवस्थापनास घ्यावे लागतील,’ असे हार्दिकने सामन्यानंतर सांगितले. मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्जविरुद्धची सलग तिसरी लढत गमावली.

सूर्यकुमार यादवने या मोसमात एक अर्धशतक केले आहे; पण अन्य चार सामन्यांत त्याची कामगिरी १६, ६, ३३ आणि ० अशी आहे. पंजाब संघाविरुद्धच्या सामन्यात त्याला भोपळाही फोडता आला नाही. तिलक वर्माने पाच सामन्यांत मिळून ४३ धावाच केल्या आहेत. त्याची कामगिरी २०, ०, १४, १ आणि ८ अशी आहे. बुमराहने अद्याप एकही विकेट घेतलेली नाही. मुंबई संघाची आगामी लढत गुजरात टायटन्सविरुद्ध २० एप्रिलला आहे. या सामन्याच्या वेळी संघात बदल होऊ शकतात.

‘अगदी प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर मी फारसे काही सांगू शकणार नाही. आम्ही कुठे कमी पडत आहोत, याचा आम्हाला विचार करावा लागणार आहे. काही खेळाडू कमी पडत आहेत की संघच पूर्णपणे अपयशी ठरत आहे की व्यूहरचना चुकीची होत आहे. नेमके उत्तर शोधावे लागणार आहे,’ असे हार्दिकने सांगितले.‘पंजाब संघाने आमच्यापेक्षा फलंदाजी सरस केली. त्यांचे क्षेत्ररक्षणही चांगले होते. गोलंदाजीही आमच्यापेक्षा उत्तम केली, त्यामुळे आम्ही पराभूत झालो,’ अशी टिप्पणी हार्दिकने केली. दरम्यान, बुमराहकडून झेल सुटल्यावर हार्दिकने कमालीचा राग व्यक्त केला होता. त्याच्या या कृतीमुळे मुंबई इंडियन्स संघव्यवस्थापन; तसेच भारतीय क्रिकेट बोर्ड हार्दिकवर नाराज असल्याची चर्चा आहे.