लेबनॉन मधील दहा दिवसीय युद्धविराम कायम राहिल्याचे दिसत असतानाही अधिकाऱ्यांनी युद्धविराम टिकेल की नाही हे स्पष्ट होईपर्यंत घरी परतण्याचा प्रयत्न न करण्याचा इशारा दिला. मात्र, विस्थापित कुटुंबे दक्षिण लेबनॉन आणि बैरुतच्या दक्षिणेकडील उपनगरांकडे जाऊ लागली आहेत.
सैन्य कायम ठेवणार
‘दक्षिण लेबनॉनमध्ये हिजबुल्लाला पूर्णपणे नि:शस्त्र करण्याचे काम अद्याप पूर्ण झाले नसले तरी इस्रायल युद्धविरामाचे पालन करेल. मात्र, इस्रायल सध्या जिथे तैनात आहे त्या सर्व ठिकाणांवर आपले नियंत्रण कायम ठेवेल’, असा इशारा इस्रायलचे संरक्षणमंत्री काट्झ यांनी दिला.
शाहबाज यांच्याशी भेट
डोनाल्ड ट्रम्प यांचे अरब आणि मध्य पूर्व व्यवहारांचे वरिष्ठ सल्लागार शुक्रवारी तुर्कीयेच्या अंताल्या या पर्यटन शहरात आयोजित एका मुत्सद्देगिरी परिषदेच्या निमित्ताने पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना भेटले. शरीफ यांच्या कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे, ‘दोन्ही बाजूंनी युद्धविराम घडवून आणण्यात पाकिस्तानने केलेले शांतता प्रयत्न तसेच ऐतिहासिक इस्लामाबाद चर्चा यांसह सध्याच्या प्रादेशिक घडामोडींवरही चर्चा केली.’
मित्रवर्य मोदींशी चांगली चर्चा : ट्रम्प
‘माझे मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी खूप चांगली चर्चा झाली. ते भारतातील माझे मित्र आहेत आणि ते उत्तम काम करत आहेत’, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले.
इस्लामाबाद : पश्चिम आशियातील युद्ध संपवण्यासाठी ऐतिहासिक शांतता करार घडवून आणण्याच्या उद्देशाने पुढील आठवड्यात अमेरिका आणि इराण यांच्यातील उच्चस्तरीय चर्चेच्या दुसऱ्या फेरीचे आयोजन करण्याची तयारी पाकिस्तानने सुरू केली आहे. इस्लामाबादमधील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ‘इस्लामाबाद आणि शेजारील रावळपिंडीमध्ये तयारी सुरू झाली आहे. इतर प्रांतांमधून हजारो पोलिस आणि जवान येण्यास सुरुवात झाली आहे.’





