‘राजस्थान’ व्यवस्थापकांची आर्थिक दंडावर सुटका

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

राजस्थान रॉयल्सचे संघव्यवस्थापक रोमी भिंदेर यांना आयपीएल सामन्यादरम्यान डगआउटमध्ये मोबाईल वापरल्याबद्दल एक लाख रुपयांचा दंड झाला. नियमांचे उल्लंघन केल्याचे मान्य केले. त्यांच्याकडून पहिल्यांदाच ही चूक घडल्याने त्यांना ताकीदही देण्यात आली. भिंदेर हे आयपीएलच्या पहिल्या मोसमापासून संघासोबत आहेत. त्यांच्याकडून हे अनवधानाने घडले असावे असा दावा केला जात आहे.

‘राजस्थान’ व्यवस्थापकांची आर्थिक दंडावर सुटका

सट्टेबाजी; तसेच निकाल निश्चिती रोखण्यासाठी आयपीएल टी-२० क्रिकेटमधील लढतीदरम्यान डगआउटमध्ये मोबाईल नेण्यास मनाई आहे. मात्र, त्यानंतरही मोबाइल डगआउटमध्ये नेल्याबद्दल ‘राजस्थान’चे संघव्यवस्थापक रोमी भिंदेर यांना एक लाख रुपयांचा दंड करण्यात आला. या संदर्भात भिंदेर यांनी दिलेले उत्तर न पटल्यामुळे हा दंड केल्याचे सांगण्यात आले.

राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात १० एप्रिलला झालेल्या सामन्याच्या वेळी हा प्रकार घडला होता. त्याबद्दल भारतीय क्रिकेट बोर्डाच्या भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाचे प्रमुख शरदकुमार यांनी भिंदेर यांना नोटीस बजावली होती. त्यास भिंदेर यांनी दिलेले उत्तर समाधानकारक नव्हते. त्यामुळे त्यांना दंड करण्यात आला. आयपीएल नियमानुसार डगआउटमध्ये मोबाइल वापरास मनाई आहे; मात्र संघासोबतच्या एका व्यक्तीस ड्रेसिंग रुममध्ये मोबाइल बाळगण्यास परवानगी आहे.

भिंदेर यांनी दिलेल्या उत्तराची शरदकुमार यांच्या अध्यक्षतेखाली तपासणी करण्यात आली. त्यांचे उत्तर असमाधानकारक होते. त्यांनी आचारसंहितेचा भंग केला आहे. आपल्याकडून चूक झाल्याचे त्यांनी मान्य केले. त्यांच्याकडून पहिल्यांदाच हे घडल्यामुळे त्यांना एक लाखाचा दंड ठोठावण्यात आला; तसेच त्यांना ताकीदही देण्यात आली आहे, असे भारतीय क्रिकेट बोर्डाचे सचिव देवजित सैकिया यांनी सांगितले.

डगआउटमध्ये आल्यावर भिंदेर आपला मोबाईल स्क्रोल करीत आहेत आणि वैभव सूर्यवंशीचे त्याकडे लक्ष वेधत असल्याचे प्रसारित व्हिडीओत दिसले होते. भिंदेर यांची प्रकृती सध्या ठीक नाही. त्यांना जिना चढताना त्रास होतो, असे काही सूत्रांनी सांगितले. भिंदेर हे आयपीएलच्यया पहिल्या मोसमापासून संघासोबत आहेत. त्यांच्याकडून हे अनवधानाने घडले असावे, असाही दावा होत आहे.