अमली पदार्थातील पैसे सरकारमध्ये कोणाला?

महाराष्ट्र टाइम्स

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. पुणे, नाशिक, मुंबईसह सर्व शहरांना अमली पदार्थांचा विळखा पडला आहे. हे अमली पदार्थ कुठून येतात आणि ते थांबविण्याची ताकद सरकारमध्ये नाही का, असा सवाल त्यांनी केला. अमली पदार्थांमधील पैसा सरकारमध्ये कोणाला मिळतो, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

government action on drugs and criticism by amit thackeray

‘पुणे, नाशिक, मुंबईसह सर्व शहरांना अंमली पदार्थांचा विळखा पडला असून, हे अमली पदार्थ कुठून येतात? ते थांबविण्याची ताकद सरकारमध्ये नाही का, अमली पदार्थातील पैसे सरकारमध्ये कोणाला जातात,’ अशी खरमरीत टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी शुक्रवारी केली. ‘मी सत्तेत असतो, तर आरोपींना फासावर दिले असते,’ असा संतापही त्यांनी नाशिकमधील आयटी कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक शोषण व धर्मांतराच्या प्रकरणावर व्यक्त केला.

पुणे जिल्हा संपर्क अध्यक्ष अमित ठाकरे यांनी पक्षाचे शहरातील प्रमुख नेते व पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार असून, लवकरच काही बदल केले जातील, असे संकेतही त्यांनी दिले.

गोरेगाव येथील म्युझिक कॉन्सर्टमध्ये अमली पदार्थांच्या अतिसेवनाने दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याच्या घटनेवरून ठाकरे यांनी सरकारला धारेवर धरले. अमली पदार्थ तस्करीची प्रकरणांची चर्चा होते. मात्र, सरकार त्याकडे गांभीर्याने पाहत नाही. अमली पदार्थांची माहिती असूनही, कारवाई होत नाही, तर यातील पैसे सरकारमध्ये कोणाला मिळतात का, हा प्रश्न आहे, अशी विचारणा त्यांनी केली. नाशिकमधील आयटी कंपनीतील लैंगिक छळ प्रकरणावरून त्यांनी कंपनीच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले. कंपन्यांचे ऑडिट झाले पाहिजे आणि आरोपींना कठोर शिक्षा ठोठावून कडक उदाहरण घालून दिले पाहिजे; त्यासाठी पोलिसांना मोकळीक दिली पाहिजे, असेही ते म्हणाले.