कॅमेरॉन ग्रीनच्या तडाखेबंद अर्धशतकाच्या जोरावर कोलकाता नाइट रायडर्स संघाने शुक्रवारी (दि. १७) आयपीएल क्रिकेट सामन्यात गुजरात टायटन्ससमोर १८१ धावांचे लक्ष्य ठेवले. ग्रीनने ५५ चेंडूंत सात चौकार आणि चार षटकारांसह ७९ धावांची खेळी केली.
नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये ही लढत झाली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ‘कोलकाता’ची सुरुवात लडखडतच झाली. कर्णधार अजिंक्य रहाणे खाते न उघडताच परतला, तर अंगक्रिश रघुवंशी (८) आणि यंदाच्या आयपीएलमध्ये पहिलाच सामना खेळणारा टिम सेइफर्टही लवकर बाद झाल्याने चौथ्या षटकात ‘कोलकाता’ची ३ बाद ३२ अशी स्थिती झाली होती. ‘पॉवरप्ले’ अर्थात पहिल्या सहा षटकात ‘कोलकाता’ची ३ बाद ३७ अशी स्थिती झाली होती. त्यानंतर रोवमन आणि ग्रीन यांनी ‘कोलकाता’च्या डावाला आकार दिला. रोवमन परतल्यानंतर ग्रीनने फटकेबाजी करून ‘कोलकाता’ला चांगल्या स्थितीत पोचवले होते. पंधरा षटकांत ‘कोलकाता’ने १४८ धावा केल्या होत्या. मात्र, ‘कोलकाता’चा डाव गडगडला. अखेरच्या पाच षटकांत ‘कोलकाता’ने पाच विकेट गमावल्या आणि केवळ ३२ धावांचीच भर घातली. ‘कोलकाता’चा डाव १८० धावांत आटोपला.





