भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याचे पैलू जाणून घेण्याची संधी वारसाप्रेमींना मिळणार आहे. उद्या रविवारी (१९ एप्रिल) सकाळी नऊ वाजता सेनापती बापट रस्त्यावरील सिम्बायोसिस संस्थेचे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्युझियम अँड मेमोरियल’ येथे हेरिटेज वॉक या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी नऊ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड’, ‘एन्शंट ट्रेल्स’, ‘क्लब हेरिटेज’ आणि ‘एच. व्ही. देसाई महाविद्यालया’चा इतिहास विभाग यांच्यातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’ या कार्यक्रमाचा मीडिया पार्टनर आहे. आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक आणि राज्य सरकारचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार विजेते लेखक मोगल जाधव उपस्थितांशी संवाद साधणार आहेत. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. गणेश राऊत असणार आहेत.
बाबासाहेबांचा यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्य प्रदेशातील महू येथे झाला. बाबासाहेबांनी देश-विदेशात सर्वोच्च शिक्षण घेतले. स्वकर्तृत्वाने जागतिक पातळीवर पोहोचलेल्या भारतीयांमध्ये बाबासाहेबांचा समावेश होतो. मनुस्मृतीचे दहन, चवदार तळ्याचा सत्याग्रह आणि काळाराम मंदिर सत्याग्रह या क्रांतिकारी आंदोलनांनंतर त्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला. ज्ञानाची अखंड उपासना हेच त्यांचे जीवनध्येय झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या हातून नवभारताची उभारणी झाली. ख्यातनाम वक्ते, प्रसिद्ध लेखक, ज्ञानाचे भुकेले, उत्तम ग्रंथसंग्राहक असे त्यांचे विविध पैलू या व्याख्यानातून उलगडले जाणार आहेत.
या हेरिटेज वॉकनिमित्त संग्रहालयाच्या शुल्कात सिम्बायोसिस संस्थेने सवलत दिली आहे. नावे नोंदविणाऱ्या पहिल्या दोनशे व्यक्तींना नि:शुल्क प्रवेश मिळेल. या कामी उद्योजक राजकुमार धुरगुडे पाटील यांचे सहकार्य मिळाले आहे. या उपक्रमातील सहभागासाठी नावनोंदणी आवश्यक आहे. मोफत तिकिटांसाठी व अधिक माहितीसाठी उमेश पोटे (९८६०७१७०७५) यांच्याशी संपर्क साधावा.





