‘जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट’ येथे मॅकेनिकल इंजिनिअरिंग आणि सायबर सुरक्षा विभागांतर्फे ‘इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनीअर्स (इंडिया)’ विद्यार्थी शाखेचे उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये तांत्रिक सहभाग आणि आंतरविद्याशाखीय शिक्षणाला चालना देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरला. प्रा. नितीन मावले, डॉ. आर. डी. खराडकर, डॉ. नितीन कोरडे, डॉ. दीपिका अजळकर आणि डॉ. आदिक यादव या वेळी उपस्थित होते. मावले आणि डॉ. खराडकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कृत्रिम बुद्धिमत्ता , सस्टेनेबल एआय आणि एजंट-आधारित एआय यांसारख्या नव्या तंत्रज्ञानाची माहिती दिली. संस्थेचे अध्यक्ष सुनील रायसोनी, कार्यकारी संचालक श्रेयस रायसोनी, प्रभारी संचालक एन. बी. हुल्ले यांनी उपक्रमाचे कौतुक केले.
गीते यांचा सन्मान
अमेरिकेतील हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या केस स्टडीत ॲल्युमिनियम सँड कास्टिंग क्षेत्रातील ‘तौरल इंडिया’चे संस्थापक आणि सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या नियामक मंडळाचे सदस्य भरत गीते यांची यशोगाथा समाविष्ट करण्यात आली आहे. ही केस स्टडी हार्वर्ड बिझनेस स्कूलचे प्रा. व्ही. जी. नारायणन यांनी तयार केली आहे. सन २०१६ मध्ये जर्मनीतील थोनी आलुटेकसोबतच्या संयुक्त उपक्रमातून सुरू झालेल्या कंपनीच्या प्रवासाचा आढावा यात घेण्यात आला आहे. ऊर्जा, रेल्वे, संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रातील कंपनीची प्रगती या अभ्यासात मांडली आहे. या केस स्टडीचे सादरीकरण नुकतेच झाले. या वेळी गीते, माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि विविध क्षेत्रातील तज्ज्ञ उपस्थित होते.
पुस्तकाचे प्रकाशन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘ग्लोबल साउथ’ संकल्पना मांडत मूल्याधिष्ठित शिक्षणाचा विचार पुढे आणला, असे मत ‘एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी’चे कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस यांनी व्यक्त केले. ‘एमआयटी डब्ल्यूपीयू’मध्ये बाबासाहेबांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमाला डॉ. संजय उपाध्ये, डॉ. दत्ता दंडगे, डॉ. विनोद जाधव, डॉ. विक्रम गायकवाड उपस्थित होते. या प्रसंगी डॉ. विनोद जाधव लिखित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : शैक्षणिक प्रवास’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. डॉ. चिटणीस यांनी ‘युद्ध नको, बुद्ध हवा’ हा संदेश अधोरेखित केला. कार्यक्रमासाठी डॉ. विश्वनाथ कराड व डॉ. राहुल कराड यांनी मार्गदर्शन केले.





