सलग चौथ्या पराभवानंतर मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार हार्दिक पंड्याने कठोर निर्णय घेण्याबाबत विचार करावा लागणार, अशी टिप्पणी केली. हार्दिक कोणाकडे नेमके लक्ष वेधत आहे, याची चर्चा सुरू झाली आहे. त्यातच हार्दिकने जसप्रीत बुमराहकडून झेल सुटल्यावर दिलेली प्रतिक्रियाही चर्चेत आली आहे.
‘नेमके काय करायला हवे, याकडे आता आम्हाला लक्ष द्यायला हवे. आम्ही कठोर निर्णय घ्यायला हवेत की जे काही सुरू आहे तेच कायम ठेवून परिस्थिती बदलेल, अशी आशा करायची, याबाबतही ठरवावे लागणार आहे. काही प्रश्नांची उत्तरे सोपी नाहीत; पण त्यास सामोरे जावेच लागेल. काही निर्णय संघव्यवस्थापनास घ्यावे लागतील,’ असे हार्दिकने सामन्यानंतर सांगितले. मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्जविरुद्धची सलग तिसरी लढत गमावली.
सूर्यकुमार यादवने या मोसमात एक अर्धशतक केले आहे; पण अन्य चार सामन्यांत त्याची कामगिरी १६, ६, ३३ आणि ० अशी आहे. पंजाब संघाविरुद्धच्या सामन्यात त्याला भोपळाही फोडता आला नाही. तिलक वर्माने पाच सामन्यांत मिळून ४३ धावाच केल्या आहेत. त्याची कामगिरी २०, ०, १४, १ आणि ८ अशी आहे. बुमराहने अद्याप एकही विकेट घेतलेली नाही. मुंबई संघाची आगामी लढत गुजरात टायटन्सविरुद्ध २० एप्रिलला आहे. या सामन्याच्या वेळी संघात बदल होऊ शकतात.
‘अगदी प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर मी फारसे काही सांगू शकणार नाही. आम्ही कुठे कमी पडत आहोत, याचा आम्हाला विचार करावा लागणार आहे. काही खेळाडू कमी पडत आहेत की संघच पूर्णपणे अपयशी ठरत आहे की व्यूहरचना चुकीची होत आहे. नेमके उत्तर शोधावे लागणार आहे,’ असे हार्दिकने सांगितले.
‘पंजाब संघाने आमच्यापेक्षा फलंदाजी सरस केली. त्यांचे क्षेत्ररक्षणही चांगले होते. गोलंदाजीही आमच्यापेक्षा उत्तम केली, त्यामुळे आम्ही पराभूत झालो,’ अशी टिप्पणी हार्दिकने केली. दरम्यान, बुमराहकडून झेल सुटल्यावर हार्दिकने कमालीचा राग व्यक्त केला होता. त्याच्या या कृतीमुळे मुंबई इंडियन्स संघव्यवस्थापन; तसेच भारतीय क्रिकेट बोर्ड हार्दिकवर नाराज असल्याची चर्चा आहे.





