‘बार्टी’च्या महासंचालकांना नोटीस

महाराष्ट्र टाइम्स

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेने (बार्टी) पीएचडी फेलोशिपची जाहिरात प्रसिद्ध केली नाही. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने या प्रकरणी बार्टीच्या महासंचालकांना नोटीस बजावली आहे. तीस दिवसांत स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले आहेत. इतर संस्थांनी फेलोशिप मंजूर केली असताना बार्टीने अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना वंचित ठेवल्याची तक्रार आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली याचिका दाखल झाली आहे.

notice to dr babasaheb ambedkar research and training institute action against non issuance of phd fellowship

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थे’ने ( बार्टी ) सन २०२३च्या पीएचडी संशोधकांसाठीची फेलोशिपची जाहिरात अद्याप प्रसिद्ध केलेली नाही. या प्रकरणाची राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने (एनसीएससी) गंभीर दखल घेऊन ‘बार्टी’च्या महासंचालकांना नोटीस बजावली आहे. तीस दिवसांत स्पष्टीकरण देण्याचे आदेशही देण्यात आले.

‘छत्रपती शाहू महाराज संशोधन, शिक्षण आणि मानव विकास शिक्षण संस्था’ (सारथी) आणि ‘महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था’ (महाज्योती) या इतर स्वायत्त संस्थांनी सन २०२३ च्या नोंदणीकृत विद्यार्थ्यांना फेलोशिप मंजूर केली असताना, ‘बार्टी’ने मात्र ३० ऑक्टोबर २०२३ च्या ‘समान निकष’ धोरणाचा चुकीचा आधार घेत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना या लाभापासून वंचित ठेवल्याची तक्रार दिली होती. वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि हृषीकेश कांबळे यांच्या पुढाकाराने याचिका दाखल झाली होती.