धरणगाव येथे सुरू असलेल्या जळगाव ग्रामीण आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात धक्कादायक प्रकार समोर आला. अंतिम सामना रंगात असताना एका चालकाने ट्रॅक्टर थेट मैदानात घालून खेळपट्टीवर नांगर चालवला. या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हा सर्व प्रकार राजकीय वैमनस्यातून घडल्याची चर्चा आहे. खेळाडूंनी दिलेल्या माहितीनुसार, या वादाला खेळातील नियमांची पार्श्वभूमी होती. संघात ठरलेल्या खेळाडू व्यतिरिक्त ‘बाहेरील’ खेळाडू खेळवून सामना जिंकल्याचा आरोप एका गटाने केला होता. याच वादाचे पर्यवसान खेळपट्टीच्या नासधूशीत ाले. तर एका पुढाऱ्याला निमंत्रण न दिल्याने स्पर्धेच्या आयोजकांमधील धूसफूसही एक कारण सांगितले जात आहे.
खेळपट्टीचे नुकसान झाल्यामुळे हा अंतिम सामना रद्द करावा लागला. यामुळे खेळाडूंचे आणि क्रीडा रसिकांचे मोठे नुकसान झाले आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया क्रीडाप्रेमी ॲड. हरिहर पाटील यांनी व्यक्त केली आहे.





