‘सात-चि’ यांची पूर्वतयारी डेन्मार्कला

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

सात्त्विकसाईराज दुखापतीतून सावरला असून चिराग शेट्टीसोबत डेन्मार्कमध्ये थॉमस कपची तयारी करणार आहे. ही जोडी २४ एप्रिल ते ३ मे दरम्यान होणाऱ्या स्पर्धेसाठी सराव करेल. भारतीय बॅडमिंटन संघटनेने ही माहिती दिली. दुसरीकडे, त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी दुखापतीमुळे उबर कपमधून माघार घेतली आहे.

‘सात-चि’ यांची पूर्वतयारी डेन्मार्कला

दुखापतीतून सावरत सात्त्विकसाईराज पुन्हा बॅडमिंटनचे कोर्ट गाजविण्यासाठी सज्ज झाला आहे. दुहेरीतील मुंबईकर जोडीदार चिराग शेट्टीसह तो थॉमस कप पुरुष सांघिक स्पर्धेच्या तयारीला लागला आहे.

जागतिक आणि आशियाई पदकविजेती ही जोडी पूर्वतयारीसाठी डेन्मार्कला रवाना होणार आहे. भारतीय बॅडमिंटन संघटनेने (बीएआय) शुक्रवारी ही माहिती दिली. ही स्पर्धा डेन्मार्कमधील हॉर्सन्स येथे २४ एप्रिल ते ३ मे दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. ‘सात-चि’ या टोपणनावाने प्रसिद्ध असलेल्या या जोडीनेच डेन्मार्कला सराव मिळावा, अशी मागणी केली होती. ‘सात-चि स्पर्धेपूर्वी काही दिवस डेन्मार्कमध्ये सराव करू इच्छितात. ते शनिवारी रवाना होतील,’ असे भारताचे दुहेरीचे प्रशिक्षक बी. सुमीत रेड्डी यांनी सांगितले.

बॅडमिंटनमधील वर्ल्ड कप, अशी ख्याती असणाऱ्या थॉमस कपचे जेतेपद भारताने २०२२मध्ये पटकावले होते. त्या यशात सात्त्विकसाईराज आणि चिराग शेट्टी या दुहेरीतील जोडीने महत्त्वाची भूमिका बजावली होती. सात्त्विकला दुखापत झाल्यामुळे ही जोडी आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत भाग घेऊ शकली नव्हती.

त्रिसा-गायत्री यांची माघार

महिला दुहेरीतील भारताची आघाडीची जोडी त्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी आगामी उबर कप सांघिक स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्रिसाच्या घोट्याला दुखापत झाल्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला आहे. त्यांच्याऐवजी श्रुती मिश्रा आणि प्रिया कोंजेंगबाम यांना संधी देण्यात आली आहे.