आचार्य विनोबा भावे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सर्वाधिक १ लाख ३७ हजार एकरचे भूदान केले. या जमिनींचे दानपत्र स्वीकारण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आले होते. आज भूदान यज्ञ मंडळाजवळ १ लाख ४ हजार ५०० एकर जमिनीची नोंद आहे. उर्वरित ३३ हजार एकर जमीन रेकॉर्डवरून बेपत्ता आहे. या जमिनीची विक्री करण्यात आल्याचा धोका भूदान चळवळीतील कार्यकर्त्यांनी वर्तविला आहे.
आचार्य विनोबा भावे आंध्र प्रदेशच्या दौऱ्यावर असताना त्यांना काही गरीब शेतमजूर भेटले. पिढ्यान् पिढ्या भूमिहीन असलेल्या या शेतमजुरांनी आपल्या व्यथा विनोबांना सांगितल्या. देशभरातील अशा भूमिहिनांसाठी काही तरी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. काही श्रीमंत शेतकऱ्यांना ‘तुम्ही मला आपला मुलगा समजा व माझ्या वाट्याची जमीन भूदानात द्या’, असे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत पोचमपल्ली येथील एका जमीनदाराने १०० एकर जमीन १८ एप्रिल १९५१ रोजी भूदानात दिली. यानंतर ही चळवळ देशभरात रूजली. यवतमाळ जिल्ह्यात भूदान चळवळ ीला अधिक प्रमाणात पाठिंबा मिळाला. माजी खासदार सदशिवराव ठाकरे, त्यांच्या पत्नी अन्नपूर्णा ठाकरे, बाबासाहेब सरोदे, चंदूसिंग नाईक, बाबासाहेब घारफळकर यांच्यासह जिल्हा सर्वोदय मंडळ, गुरुदेव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाभर पदयात्रा काढून जमिनीचे दान मिळविले. त्यावेळी राज्यात भूदानात १ लाख ८० हजार एकर जमिनीचे दान मिळाले होते. यापैकी १ लाख ३७ हजार एकराचे दान एकट्या यवतमाळ जिल्ह्यातील होते. विनोबांना हे समजताच त्यांना आनंद झाला. तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी या जमिनींचे दानपत्र स्वीकारण्यासाठी येण्याचे मान्य केले. १८ एप्रिल १९५९ रोजी गोधनी रोडवर भव्य कार्यक्रम घेण्यात आला. तत्कालीन मुख्यंमत्री रविशंकर शुक्ला, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, तत्कालीन राज्यमंत्री वसंतराव नाईक, सदाशिवराव ठाकरे, जवाहरलाल दर्डा, आबासाहेब पारवेकर, सुधाकरराव नाईक उपस्थित होते. भरउन्हात; ४० अंश सेल्सिअस तापमानातही नागरिक पंतप्रधान पंडित नेहरू यांना पाहण्यासाठी आले होते. मात्र विनोबांचा भूदान चळवळ सुरू करण्यामागचा उद्देश मागील ७५ वर्षांत हरविल्याचे दिसून येत आहे.





