चेन्नईत झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या वर्ल्ड कप टी-२० सामन्यात कॅनडाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( आयसीसी ) भ्रष्टाचारविरोधी संहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी चौकशी सुरू आहे. एका माहितीपटातून ही बाब उघड झाल्याचे शुक्रवारी आयसीसीकडून सांगण्यात आले. भारत मुख्य यजमान असलेल्या या स्पर्धेचे न्यूझीलंड उपविजेते आहेत.
१७ फेब्रुवारीला चेन्नईत झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडने कॅनडावर आठ विकेट राखून विजय मिळवला होता. शुक्रवारी प्रसारित झालेल्या माहितीपटातून भ्रष्टाचाराचे आरोप उघडकीस आल्यानंतर आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाने (एसीयू) याची सखोल चौकशी करण्यास सुरुवात केली.
कॅनडाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना १७३ धावा केल्या होत्या. न्यूझीलंडने हे लक्ष्य केवळ १५.१ षटकांत गाठले. ग्लेन फिलिप्स (३९ चेंडूंत नाबाद ५९ धावा) आणि रचिन रवींद्र (३६ चेंडूंत नाबाद ७६ धावा) यांनी कॅनडाच्या गोलंदाजांची पिसे काढत न्यूझीलंडला सहज विजय मिळवून दिला होता.
क्रिकेट कॅनडाच्या संदर्भात आयसीसीकडून दोन प्रकरणी चौकशी अपेक्षित आहेत. त्यांच्या देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेतही आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी संहितेचे उल्लंघन झाल्याचा आरोप आहे.
हेदेखील महत्त्वाचे
एका ४३ मिनिटांच्या महितीपटानंतर क्रिकेट कॅनडाबद्दल आयसीसीने आरोप निश्चित केले.
शुक्रवारी प्रसारित झालेल्या या माहितीपटाचे शीर्षक 'करप्शन, क्राइम अँड क्रिकेट' असे आहे.
हा माहितीपट कॅनडातील एक शोध कार्यक्रम 'द फिफ्थ इस्टेट'ने तयार केली आहे.
या माहितीपटातून क्रिकेट कॅनडातील भ्रष्टाचार आणि प्रशासनाशी संबंधित मुद्द्यांबाबत व्यापक दावे करण्यात आले आहेत.संशय का?
न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात कॅनडाचा कर्णधार दिलप्रीत बाजवा याने टाकलेल्या पाचव्या षटकावर संशय व्यक्त करण्यात आला आहे.
स्पर्धेच्या तीन आठवडे आधीच अष्टपैलू बाजवा याची कर्णधार नियुक्ती झाली होती.
ऑफ स्पिनर बाजवा गोलंदाजीसाठी आला तेव्हा न्यूझीलंडची धावसंख्या दोन बाद ३५ धावा.
बाजवाने टाकलेल्या षटकातील पहिला चेंडू नोबॉल ठरला, त्यानंतरचा चेंडू लेग साइडला वाइड. या षटकात एकूण १५ धावा.लक्षवेधक
दुसरी चौकशी कॅनडाचे माजी प्रशिक्षक खुर्रम चौहान यांच्याशी संबंधित .
क्रिकेट कॅनडाच्या काही वरिष्ठ सदस्यांनी खेळाडूंच्या निवडीसाठी दबाव टाकल्याचे लीक झालेल्या एका फोन रेकॉर्डिंगमधून समोर आले आहे.
या रेकॉर्डिंगमध्ये सामन्यांमध्ये फिक्सिंगचा प्रयत्न झाल्याचे दावे करण्यात आले आहेत.





