ममता यांच्या भवानीपूर मतदारसंघात फळविक्रेता मोहम्मद आमीर यांचे नाव मतदारयादीत आहे. ‘आमच्या कुटुंबातील सर्वांची नावे मतदारयादीत आहेत’, असे सांगताना मोहम्मद यांनी ‘एसआयआर’ हा मुद्दा नाही, असे नमूद केले.
मुर्शिदाबादच्या प्रतापगंज गावात नौशाद अली आणि त्यांच्या पत्नीने नाव मतदारयादीत आहे. मात्र, त्यांच्या मुलाचे नाव वगळली गेली आहेत. मुर्शिदाबादच्याच समशेरगंजमध्ये ९२ हजार नावे वगळली आहेत. त्यात सादिक शेख (५५) यांचा समावेश आहे. ‘आवश्यक सर्व कागदपत्रे सादर केली. मात्र, मतदारयादीत समावेश नाही’, असे त्यांनी सांगितले. ‘निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालच्या घुसखोरांना मतदारयादीतून बाहेर काढले आहे. आता त्यांना देशाबाहेर काढणे हे पुढचे मोठे काम आहे’, असे विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अलीकडेच केले. त्यामुळे घुसखोर ठरवून बांगलादेशी असा शिक्का मारला जाईल, अशी भीती ‘एसआयआर’बाधितांमध्ये दिसते. दुसरीकडे, ममता यांना घुसखोर मतदान करीत असल्याने त्यांची नावे वगळल्याने तृणमूलचा पराभव होईल, असा भाजप समर्थकांचा दावा आहे.
अनेक ठिकाणी गेल्या वेळी विजयी उमेदवाराच्या मताधिक्यापेक्षा वगळलेली नावे अधिक आहेत. त्यामुळे लढती रंगतदार होईल. ‘एसआयआर’बाधित मुस्लिम आणि हिंदू एकवटले तर आपल्यालाच लाभ होईल, असे तृणमूलचे म्हणणे आहे. तर, घुसखोर आणि बोगस मतदारांच्या मुद्दयावर मतदार साथ देतील, असा विश्वास भाजपला वाटतो. घुसखोरांचे भय दाखवून हिंदू मते मिळवण्याचे भाजपचे प्रयत्न आहे. , तर बांगलादेशी ठरवून देशाबाहेर काढण्याची भीती दाखवून मुस्लिमांची मते खेचण्याचे तृणमूलचे प्रयत्न असल्याचे जादवपूर विद्यापीठाचे राज्यशास्त्राचे प्राध्यापक अब्दुल मतीन यांनी सांगितले.
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांतील मतुआ (अनुसूचित जाती) समाजाला ‘एसआयआर’चा फटका बसला आहे. मतुआ समाजाचे प्राबल्य असलेल्या बहुतांश जागा गेल्या वेळी भाजपने जिंकल्या होत्या. नदिया, उत्तर २४ परगणा आणि उत्तर बंगालमधील काही भागांतील सुमारे ५५ जागांमध्ये मतुआ समाजाचे प्राबल्य आहे. या समाजाला घाबरण्याची गरज नाही, त्यांना संरक्षण दिले जाईल, अशी भूमिका भाजपने घेतली होती. आता त्यातील अनेकांची नावे वगळल्याने त्यांच्यात भाजपविरोधात रोष आहे.





