१८ एप्रिल १९६६ रोजी झालेल्या मोर्चाद्वारे कोणत्या प्रमुख मागण्या मांडल्या होत्या?
हमीद दलवाई यांनी १८ एप्रिल १९६६ रोजी विधानसभेवर सात मुस्लिम महिलांचा मोर्चा काढला होता. तोंडी, एकतर्फी तलाक बंद व्हावा, बहुपत्नीत्व पद्धत बंद व्हावी, समान नागरी कायदा तयार करावा अशा मुख्य मागण्या केंद्रस्थानी होत्या. त्याकाळी या महिलांनी धाडसाने उलेमांचा धिक्कार केला होता. तत्कालीन मुख्यमंत्री आणि आमदारांनी खाली येऊन मोर्चाचे निवेदन स्वीकारून आश्वासन दिले होते. मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना १९७०मध्ये झाली असली, तरी मंडळाच्या कामाची बीजे त्यामध्ये रोवली गेली.
मोर्चाला साठ वर्षे पूर्ण होताना या प्रश्नांची सद्यस्थिती काय आहे?
केंद्र सरकारने तलाकबंदी विधेयक आणले. मात्र, पूर्णत: तलाकबंदी लागू व्हावी. कौटुंबिक प्रश्न न्यायालयीन पद्धतीने मार्गी लागण्याची तरतूद व्हावी. बहुपत्नीत्व बंदी, व्यक्तिगत कायद्यातील तरतूदी आणि समान नागरी कायद्याची अंमलबजावणी अशा समस्या आजही अनुत्तरित असून, मंडळाला अजूनही याच विषयावर काम करावे लागते आहे, ही वस्तुस्थिती आहे. मुस्लिम व्यक्तिगत कायद्यात सुधारणा करण्याची मागणी महिलांकडून जोर धरत आहे. बहुपत्नीत्व प्रथेच्या बंदीसाठीही सामाजिक संघटना, महिला संघटना सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचल्या असून, याबाबत कायदा आल्यास बहुपत्नीत्वाचा प्रश्न मिटण्यासह सुधारणेलाही गती मिळेल.
सामाजिक सलोख्यासाठी समाजातून काय प्रयत्न होणे आवश्यक आहे?
भारतात सलोख्याची संस्कृती पूर्वीपासून आहे. सद्यस्थिती पाहता मुस्लिम समाजाने आधुनिकतावाद अंगीकारण्याची गरज आहे. माध्यमांतून मुस्लिमांची प्रतिमा भडक दाखविल्याने सलोख्यावर परिणाम होत असून, बहिष्काराची भाषा वाढताना दिसते आहे. मुस्लिमांना अधिकाधिक लक्ष्य करण्यात येत असून, यात राजकीय लोकांचे प्रमाण अधिक आहे. हेच वातावरण राहिल्यास मुस्लिम समाजात सुधारणा करणे अवघड होईल.
मंडळाचा कार्याचा इतिहास ग्रंथरूपाने प्रकाशित होत आहे, याबाबत काय सांगाल ?
राज्याच्या साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे ‘मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या कार्याचा इतिहास खंड १ आणि २’ प्रकाशित करण्यात येणार आहेत. यामध्ये हमीद दलवाई यांचे कार्य, मंडळाचे सहा दशकांचे कार्य, ध्येय, उद्दिष्ट, चळवळीचे यशापयश अपयश, विरोध आणि विरोधकांचा मतप्रवाह, हमीद दलवाई यांच्या नंतरचा चळवळीचा काळ अशा विविध विषयांवर प्रकाश टाकण्यात येणार आहे. हे साहित्य संशोधक, अभ्यासकांसाठी महत्त्वाचे ठरेल.





