एसटीची ‘यूपीआय’ सेवा बंद

महाराष्ट्र टाइम्स

एसटी महामंडळाची यूपीआय डिजिटल तिकीट सेवा गेल्या २० दिवसांपासून बंद आहे. यामुळे प्रवाशांना पुन्हा रोखीने तिकीट काढावे लागत आहे. पूर्वी सुट्ट्या पैशांची समस्या यूपीआयमुळे मिटली होती. आता ऑनलाइन पैसे भरल्यास तिकीट निघत नाही, अशा तक्रारी येत आहेत. वाहकांनाही याबद्दल माहिती नाही. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.

एसटीची ‘यूपीआय’ सेवा बंद
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

तिकीट काढताना सुट्या पैशांची कटकट दूर करण्यासाठी एसटी महामंडळाने यूपीआय डिजिटल सेवा सुरू केली. या सेवेला प्रवाशांनी प्रतिसाद दिला. मात्र गेल्या २० दिवसांपासून ही सेवा बंद पडल्याने प्रवाशांना रोखीने तिकिटे घ्यावी लागत आहेत.

एसटी बसेसमधून प्रवास करीत असताना तिकिटाच्या सुट्ट्या पैशांवरून वाद वाढले होते. काही वर्षांपूर्वी राज्य परिवहन विभागाने कात टाकत तिकिटांसाठी यूपीआय सेवा सुरू केली. फोन पे, गुगल पे यासारख्या डिजिटल सेवेमुळे प्रवासी आणि वाहकांचीही सुट्या पैशांची समस्या संपली. जितके तिकीट, तेवढेच पैसे ऑनलाइन टाकले की वादाचा प्रश्नच उरत नव्हता. या सेवेला प्रवाशांनी प्रतिसाद दिला. डिजिटल पेमेंटच्या माध्यमातून एसटी महामंडळाला कोट्यवधीचा महसूल मिळाला. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ही डिजिटल सेवा बंद पडली आहे. पुन्हा एकदा कॅशमध्ये तिकीट काढण्यास सुरुवात झाली आहे. याबाबत वाहकांना विचारणा केली असता त्यांनाही काही कल्पना नाही. चुकून एखाद्या प्रवाशाने तिकिटाचे ऑनलाइन पैसे भरले तर त्याचे पैसे कापले जातात, पण तिकीट निघत नाही, अशाही तक्रारी वाढल्या आहेत.