राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमध्ये सुरू झालेल्या ऑनलाइन तिकीट सुविधेमुळे प्रवाशांना दिलासा मिळाला होता. मात्र, क्यूआर कोडच्या माध्यमातून सुरू झालेल्या या सुविधेत गेल्या काही दिवसांत तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. या प्रकारामुळे प्रवाशांना पुन्हा रोख व्यवहाराचा सामना करावा लागत असून, प्रवाशांचा या सुविधेबाबत तक्रारीचा सूर आहे.
एसटी महामंडळाने ‘यूपीआय’ आणि ‘क्यूआर कोड’च्या माध्यमातून तिकीट देण्याची सुविधा सुरू केल्यानंतर डिजिटल व्यवहारांना मोठा प्रतिसाद मिळाला होता. या प्रणालीतून राज्यात दरमहा ५० कोटी रुपयांहून अधिक उत्पन्न मिळत असल्याचेही समोर आले होते. पुणे विभागातदेखील क्यूआर कोडच्या माध्यमातून पावणेतीन कोटी रुपये महिन्याला मिळत होते. मात्र, सध्या नेटवर्क समस्या, सर्व्हर डाऊन किंवा यंत्रणेत बिघाड असल्याचे कारण सांगून अनेक ठिकाणी वाहकांकडून ऑनलाइन तिकीट नाकारले जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. अनेक प्रवासी आता रोख रक्कम कमी प्रमाणात बाळगतात; त्यामुळे ऐन वेळी रोखीने तिकीट काढण्यास सांगितल्यास त्यांची अडचण होते. प्रवाशांकडून रोख रक्कम घेतल्यानंतर सुट्ट्या पैशांवरूनही वादाचे प्रसंग घडत आहेत. दरम्यान, उन्हाळी हंगाम सुरू झाल्यामुळे प्रवाशांची संख्या वाढली आहे. सुट्ट्यांमुळे प्रवासी वाढले आहेत. एसटी महामंडळाने हंगामी दरवाढही लागू केली आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी तिकीटदर जास्त असल्याने प्रवासी ऑनलाइन पेमेंटवर अवलंबून असतात. अशा वेळी ऑनलाइन प्रणाली बंद पडल्यास प्रवाशांना मनस्ताप होतो. डिजिटल सुविधेवर विश्वास ठेवणाऱ्या प्रवाशांना पुन्हा सुरळीत सेवा मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





