कोलकाता नाइट रायडर्स संघ जणू आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेत आहे. कॅमेरुन ग्रीनने ३ बाद ३२वरून कोलकाता संघाचा डाव १५व्या षटकांपर्यंत ४ बाद १३९ असा सावरला होता. मात्र कोलकाता संघाच्या तळाच्या फलंदाजांनी एकापाठोपाठ बाद होताना ग्रीनला फलंदाजीपासूनही दूर ठेवले. त्यामुळे कोलकाता संघास गुजरात टायटन्सविरुद्धच्या आयपीएल टी-२० क्रिकेटमधील सामन्यांत १८० धावांवर समाधान मानावे लागले.
अजिंक्य रहाणेचे अपयश कायम राहिले, अंगक्रिश रघुवंशी आणि टीम सीफर्टही पॉवरप्लेमध्ये परतले. या परिस्थितीत ग्रीनलाही संथ सुरुवात करावी लागली. त्याने ४ षटकातील ३ बाद ३२ या केविलवाण्या सुरुवातीनंतर रोवमन पॉवेलसह ४३ चेंडूंत ५५ धावा जोडल्या. त्यानंतर अनुकुल रॉय (७ चेंडूत ९) नॉन स्ट्राईकर असताना २३ चेंडूंत ६० धावांची भागीदारी केली. कोलकाता संघास द्विशतक खूणावत होते. मात्र जम बसलेल्या ग्रीनला सुरुवातीस साथच मिळाली नाही. त्यानंतर तो फलंदाजीपासूनही दूर राहिला.
कोलकाताचे पाच फलंदाज २२ चेंडूंत बाद झाले. त्यावेळी ग्रीन केवळ दोन चेंडूच खेळायला मिळाले. प्रसिध कृष्णाने १९व्या षटकांत तीन यॉर्कर टाकत ग्रीनला नॉन स्ट्राईकला ठेवले. ग्रीनची लय हरपली गेली. ४४ चेंडूंत ७५ धावा करणारा ग्रीन त्यानंतरच्या ११ चेंडूंत ४ धावाच करू शकला. या कालावधीत कोलकाताचे सहा फलंदाज ३३ धावांत परतले. पहिल्या २९ चेंडूंत २७, त्यानंतर १३ चेंडूंत ४८ आणि अखेरच्या ११ चेंडूंत ४ हे ग्रीनबाबत घडले. सिराज, रबाडा, अशोक शर्मा यांनी दिलेल्या हादऱ्यातून कोलकाताचा संघ कधीच पूर्ण सावरला नाही.





