येरवडा : वडापाव खाल्ल्याचे पैसे मागितल्याचा राग आल्याने हातगाडी चालकाला शिवीगाळ करून त्याची गाडी हत्याराने फोडण्याचा प्रकार लोहगाव येथे घडला. या प्रकरणी लोहगाव पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली.
दीपक उर्फ अण्णा तुकाराम गायकवाड (वय ४२, रा. लोहगाव), विजय गणपत खुडे (वय ४५, रा. दत्तवाडी) आणि सचिन भाऊसाहेब साठे (वय ४०, कोरेगाव पार्क) असे अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी ५२ वर्षीय महिलेने लोहगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. लोहगाव भागात प्रकाश जगताप यांची वडापावची गाडी असून, आरोपींनी वडापाव खाल्ल्याचे पैसे मागितले म्हणून त्यांच्या गाडीसह त्यांच्या भावाच्या फ्लॅटमध्ये शिरून टीव्ही आणि फ्रिज यांचीही तोडफोड केल्याचे तक्रारीत नमूद आहे. मुख्य आरोपी एका संघटनेचा अध्यक्ष असल्याने राजकीय नेत्यांनी पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिस ठाम राहिल्याने या प्रकरणी गुन्हा दाखल झाला.





