ग्रँड स्विस स्पर्धेत वैशाली प्रागच्या आग्रहामुळे सहभागी झाली. या स्पर्धेतील विजेतेपदामुळे तिला यशाबद्दल विश्वास दिला. ‘या स्पर्धेसाठी दीर्घ पूर्वतयारी केली. गत वर्षी यश दुरावत असल्याने काहीशी निराश होते. ग्रँड स्विस यशाने विश्वास दिला. या स्पर्धेतील यश हेही दीर्घकालीन पूर्वतयारीचे फळ आहे,’ असे तिने सांगितले. वैशाली या स्पर्धेतील सर्वांत कमी मानांकित खेळाडू होती. जागतिक महिला क्रमवारीत ती सध्या १९वी आहे. मात्र, यास वैशाली फार महत्त्व देत नाही.
‘या स्पर्धेतील माझ्या मोहिमेत कमालीचे चढ-उतार होते. प्रतिकूल परिस्थितीत असताना आई, प्रज्ञानंदची लाभलेली साथ मोलाची ठरली,’ अशी भावना भारताची बुद्धिबळपटू आर. वैशालीने व्यक्त केली.
२४ वर्षीय वैशालीने कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेत महिला गटाचे विजेतेपद पटकावले. ही स्पर्धा जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. या यशामुळे जागतिक महिला विजेतेपदाच्या लढतीसाठी आव्हान देणारी खेळाडू झाली आहे. वैशाली या वर्षाअखेरीस जागतिक विजेती जू वेनजून (चीन) हिला आव्हान देईल. विजयानंतर वैशाली म्हणाली, ‘कमालीचा तणाव असलेल्या या स्पर्धेच्या वेळी कुटुंबीयांची साथ महत्त्वाची असते. ही दीर्घ स्पर्धा होती. त्या वेळी तणावही जास्त असतो. सुदैवाने माझ्यासह आई आणि प्रज्ञानंद होते. त्यांची साथ मोलाची होती, तीच निर्णायक ठरली.’ विजेतेपद जिंकल्यानंतरही वैशाली तणावाखाली होती. त्यानंतरही तिच्या चेहऱ्यावर हास्य दिसत नव्हते. मात्र, आई आणि प्रप्रज्ञानंद भेटल्यावर तिने खऱ्या अर्थाने विजेतेपदाचा आनंद साजरा केला. वैशालीने इतर भारतीय बुद्धिबळपटूंचेही आभार मानले.





