बुलढाणा : केंद्र सरकारच्या भारत-अमेरिका व्यापार कराराविरोधात काँग्रेसने राज्यभर शेतकरी न्याय सत्याग्रह आंदोलन सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर बुलढाण्यात शुक्रवारी गांधी भवन प्रांगणात जिल्हा युवक काँग्रेस च्यावतीने निषेध आंदोलन करण्यात आले. युवक काँग्रेसचे प्रदेश महासचिव विश्वदीप पडोळ यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. शेतकरीविरोधी यूएस ट्रेड डील त्वरित रद्द करा, शेतकऱ्यांना एमएसपीची कायदेशीर हमी द्या, भारताचा डेटा अमेरिकेला देऊ नका, या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. आंदोलनात काँग्रेसचे संघटन सृजन अभियान समन्वयक अब्दुल हनान, सहसमन्वयक वीरेंद्र जगताप, युवक काँग्रेस प्रदेशचे महासचिव विश्वदीप पडोळे, युवक काँग्रेस प्रदेश सचिव शिवराज पाटील, काँग्रेस नेते संदीप शेळके यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी सहभागी झाले होते.
लाचखोरास अटक
बुलढाणा : फेरफारसंबंधित अंतिम आदेशाच्या प्रतीकरिता वीस हजारांची लाच घेताना मेहकर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयातील प्रस्तुतकार तथा सहाय्यक महसूल अधिकारी कैलास मुरकुट याला वाशीमच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले. १६ एप्रिलच्या सायंकाळी चारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. तक्रारकर्त्या वकिलाने पक्षकार या नात्याने चुलत आजोबांच्या जमिनीचे फेरफार रद्द करण्यासाठी कायदेशीर बाबी पाहण्यासाठी वकीलपत्र घेतले आहे. फेरफारवरील अपीलावर २३ फेब्रुवारी रोजी अंतिम आदेश झाला होता. अंतिम आदेशाची मूळ नक्कल घेण्यासाठी मुरकुट याने २० हजारांची लाच मागितली. याबाबत वकिलांनी वाशीम येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
वनकोठडीत वाढ
चंद्रपूर : सावली येथील कासवाच्या शिकार प्रकरणात अटकेतील सहापैकी तीन आरोपींची वनकोठडी गुरुवारी तीन दिवसांनी वाढली आहे. तर उर्वरित तीन आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. सिरसी नियतक्षेत्रामधील चिचडोह बॅरेज परिसरात कासवावर काळी जादू करण्यासाठी नेत असताना मुद्देमालासह सहा आरोपींना पकडण्यात आले होते. गंगाधर पांडू बुरांडे (४९), मोरेश्वर देविदास देवतळे (३८), राजेंद्र शामराव दिवसे (५२), ओमदेव गिताबाई शिंदे (२५), हेमचंद उमाजी शेंडे (२८), धवल उसटू वेलादी (३०) यांचा आरोपींमध्ये समावेश आहे.





