लीकडे वृक्षलागवडीसोबतच बीजसंकलन उपक्रमांना चालना मिळाली आहे. मात्र नैसर्गिक प्रक्रियांमध्ये हस्तक्षेप करताना, शास्त्रीय समज अत्यावश्यक असते. वनस्पतींचे अचूक ज्ञान, योग्य टप्प्यावर आणि मर्यादेत बीजसंकलन, वैविध्य जपणे हे मुद्दे कळीचे ठरतात.
स्थानिक प्रजातींचे बियाणे आणि रोपे सहज उपलब्ध झाल्याने वनीकरण, अधिवास पुनर्संचयन आणि नर्सरी व्यवस्थापन अधिक परिणामकारक झाले आहे. स्थानिक बियांपासून तयार झालेली रोपे स्थानिक हवामान, माती आणि पर्यावरणाशी सुसंगत असल्यामुळे त्यांची वाढ जलद व सुदृढ होते. मात्र अतिसंकलनामुळे मूळ नैसर्गिक स्रोतावर नकारात्मक परिणाम होऊ नये आणि आनुवंशिक विविधता टिकून राहावी, याची काळजी घ्यायला हवी. यासाठी प्रजातींची प्रजनन पद्धती, फुलोरा-फळधारणा कालावधी आणि प्रसार यांचा अभ्यास आवश्यक ठरतो. वेगवेगळ्या वनस्पतींपासून बियाणे गोळा केल्याने आनुवंशिक विविधता जपली जाते; तर मोजक्या झाडांपासूनच बिया गोळा केल्यास ही क्षमता कमी होते.
जांभूळ किंवा उंबर यांसारख्या वनस्पतींची सर्व फळे एकाच वेळी काढल्यास, त्यावर अवलंबून असलेले पक्षी, कीटक आणि प्राण्यांच्या अन्नसाखळीवर दुष्परिणाम होतो. फांद्या हलवून, तोडून किंवा झोडपून बिया गोळा केल्यास वृक्षांना हानी पोहोचते. मातीची सुपीकता टिकवणे आणि सूक्ष्मजीवांना पोषण यांसाठी काही बियाणे जमिनीत राहणे आवश्यक असते. परिपक्व बियाण्यांपैकी २० टक्क्यांपेक्षा अधिक संकलन टाळावे, असे एका अभ्यासात नमूद केले आहे. अतिसंकलनामुळे अपक्व, निकृष्ट बियांचे प्रमाण वाढून संवर्धनाचे प्रयत्न निष्फळ ठरू शकतात. दुर्मीळ प्रजातींसाठी हा धोका अधिक असतो. योग्य साठवणुकीचे ज्ञानही महत्त्वाचे आहे. सर्व बियाणे दीर्घकाळ साठवण सहन करत नाही; जांभूळ, आंबा, फणस यांसारखे ‘रीकॅल्सिट्रंट’ बियाणे ताजे असतानाच न पेरल्यास उगवणक्षमता झपाट्याने घटते.
एकंदरीत, बीजसंकलन ही निसर्गसंवर्धनाची प्रभावी पद्धत असली, तरी ती शाश्वत आणि शास्त्रीय तत्त्वांवर आधारित असेल, तरच परिसंस्थेचा समतोल राखला जाईल. अन्यथा अल्पकालीन लाभांआड दीर्घकालीन हानी होऊ शकते.- डॉ. प्राची क्षीरसागर







