बालपणी अनुभवलेलं सुख जपणारं बेटावद

Contributed byस्नेहा शिंपी|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

लेखक आपल्या बेटावद (ता. शिंदखेडा) येथील आजोळी घालवलेल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देतात. सुट्ट्यांमध्ये गावाकडची मोकळी हवा, प्रेमळ माणसं, नदी, बागबगीचे आणि फळांची चव आठवते. गावातील रथयात्रा, वणीगड सप्तशृंगीदेवीचे माहेर आणि शिंपी व माळी समाजाची जत्रा याबद्दलही ते सांगतात. गुळाची जिलेबी, गोडी शेव आणि शंकराचे मंदिर या आठवणी आजही ताज्या आहेत.

बालपणी अनुभवलेलं सुख जपणारं बेटावद

त्र आणि वैशाख महिन्यात सुट्ट्या लागताच आवडत्या गावाकडे जाण्याची ओढ असतेच. आठवणीतलं गाव म्हणताच, मन आजोळी गेलं आणि तिथल्या सुंदर स्मृतींना उजाळा मिळाला. माझं आजोळ धुळे जिल्ह्यातलं बेटावद (ता. शिंदखेडा). नोकरीनिमित्त वडील मुंबईत आल्यानं आम्ही सुट्ट्यांमध्येच आजोळी जात असू. गावी आजी-आजोबा, काका-काकू आणि त्यांची मुलं होती. जवळच मोठी आत्यादेखील राहत असल्यानं आम्ही सगळी भावंडं व भोवतालचा मित्रपरिवार दंगामस्ती करायचो.

गावाकडची मोकळी हवा, प्रेमळ माणसं, नदी, बागबगीचे आणि दुतर्फा झाडी, प्राचीन मंदिरं हे सगळं हवंहवंसं वाटे. आमच्या बेटावद गावी आमराईनं बहरलेली झाडं, सिताफळ, पेरू, कलिंगड, खरबूज यांचे अशी मधुर चवीची फळं असत. रंगीबेरंगी फुलांचे बाग बगीचे हे वेगळंच आकर्षण असे. बेटावदची पांझरा नदी ही दीड पुरुष खोल असल्याचं वदंता होती. उन्हाळ्यात पाणी आटलं, तर लोकं किनाऱ्यावर दोन ड्रम खोचून त्यात झऱ्यांचं पाणी साठवून ठेवत. एकातलं पाणी कपडे धुवायला, तर दुसऱ्या ड्रमातलं पाणी जनावरांना पिण्यासाठी असे.


बालपणी अनुभवलेलं सुख जपणारं बेटावद

आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, बेटावद हे वणीगड सप्तशृंगीदेवीचं माहेर आहे आणि सासर बेच कळवण हे बऱ्याच जणांना ज्ञात नाही. जळगावपुढच्या मुडावद गावात त्रिसंगम गंगा, जमुना आणि सरस्वती नद्या आहेत. बेटावद गावाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे, आमच्या शिंपी समाजाची आणि माळी समाजाची मोठी रथयात्रा. आमच्याचं दारातच रथ उभा राहतो आणि मोठी जत्रा भरते. गावकरी या रथोत्सवाचा मनसोक्त आनंद लुटतात. खरेदीसाठी झुंबड उडते.

चैत्र पौर्णिमेच्या आदल्या दिवशी गावातला एक ब्राह्मण मनुष्य चतुर्दशीला वणी गडावर ध्वज घेऊन जातो. कोणत्या मार्गाने जातो, हे आजपर्यंत गुपितच आहे. जाताना पांढरं स्वच्छ वस्त्र असतं आणि येताना फाटलेलं, माखलेलं वस्त्र दृष्टीस पडतं, असं म्हणतात. देवी मंदिराच्या पायऱ्यांपासून एक आदिवासी कळसाला ध्वज लावतो. जळगावात तापी नदीत भर पाण्यात लोखंडी हत्ती आहे. तो बुडाल्यास सुरतमध्ये; तसंच बेटावदमध्ये व आजूबाजूच्या गावांत महापूर येतो. समुद्र व तापी नदी जास्तीचं पाणी घेत नाहीत आणि ते पाणी बाहेर फेकलं जाऊन आजुबाजूच्या गावांत महापूर येतो, असं आजी-आजोबांकडून ऐकलं आहे.

आमच्या गावात गुळाची जिलेबी, गोडी शेव प्रसिद्ध आहे. शंकराचं व देवीचं मंदिर, घरात विहीर, धाब्यावर चांदणं बघत झोपणं, मायाळू व प्रेमळ लोक यामुळे आजोळी जाण्याचा मोह आम्हाला कायमच भारावून टाकत असे. गावात प्रामुख्यानं शिवणकाम व शेतीकाम असे. शेजारच्या बायका मिळून वाळवणं करीत. संध्याकाळी आजीकडून छान छान गोष्टी ऐकताना ज्ञानात भर पडत असे. आमचं घर खूप मोठं होतं. घरामागे मोठी विहीर असल्यानं त्यातून पाणी शेंदणं हा आमचा नित्यक्रम असे. समोरच्या पटांगणात आम्ही बाळगोपाळ खेळत असू.

गावाकडच्या लोकांना आमच्या येण्यानं आनंद होत असे. त्या काळी सगळ्यांना मुंबईचं अप्रूप असल्यानं मुंबईची पोरं आली, असं ते कौतुकानं म्हणत. झाडांवर चढून चिंचा, बोरं, कैऱ्या तोडून खाण्यात वेगळीच मजा असे. हा आनंद आम्ही उपभोगला; आजची पिढी याला मुकतेय, याची खंत मन अस्वस्थ करते. आजही गावाविषयी बोलताना, लिहिताना डोळ्यांसमोर ते बालपणीचं चित्र उभं राहतं.