गाडी शिकण्याचे अडलेले घोडे

Contributed byदिनेश भदाणे|महाराष्ट्र टाइम्स.कॉम
Maharashtra Times

युष्याच्या प्रवासात आपण अनेक शिखरं सर करतो; पदव्या मिळवतो, करिअरमध्ये स्थिरावतो आणि जगाच्या नजरेत यशस्वी होतो. प्रत्येकाच्या यशाच्या कपाटात एक कोपरा असा असतो, जिथं एखादी छोटीशी ‘राहून गेलेली गोष्ट’ असते. माझ्या ३४ वर्षांच्या आयुष्यात ही बोचणारी गोष्ट म्हणजे, गाडी चालवायला शिकणं.

शालेय जीवनापासूनच गणित आणि विज्ञानासारख्या कठीण विषयांत मी नेहमीच अव्वल राहिलो. कठीण समीकरणं सोडवणं मला कधीच जड गेलं नाही; पण सायकल किंवा दुचाकीचा ‘बॅलन्स’ सांभाळण्याचं समीकरण मात्र कधी सुटलं नाही. अभ्यासात पुढं असणारा मी चाकांच्या शर्यतीत मागंच राहिलो. मनाच्या कोपऱ्यात कुठं तरी अपघाताची भीती आणि आत्मविश्वासाचा अभाव कायम होता.

सन २०२० उजाडलं. करोनाच्या सावटाखाली जग जाण्यापूर्वी माझे परममित्र महेश परीट यांनी कंबरच कसली. एका मोकळ्या पटांगणात त्यांनी स्वतः लक्ष घालून मला गाडी शिकवण्याची पराकाष्ठा केली; पण लॉकडाउन सुरू झाल्यावर सरावाअभावी ते नुकतंच आलेलं कौशल्य पुन्हा विस्मृतीत गेलं. चारचाकीच्या प्रशिक्षणाचंही तसंच झालं; सराव नसल्यानं स्टिअरिंगवरचा ताबा सुटला आणि भीती मनात बसली.

आजच्या या ‘फास्ट फॉरवर्ड’ युगात गाडी चालवणं ही गरज झालेली असताना, ही उणीव खूप बोचते. लग्नानंतर ही खंत अधिकच गडद झाली. नशिबानं माझ्या पत्नीला उत्तम गाडी चालवता येत असल्यानं मला ‘हक्काचा सारथी’ मिळाला आहे. सुरुवातीला वाटणारी लाज आता मी बाजूला सारली आहे.

या प्रवासात ज्यांनी माझ्या या कमकुवत दुव्याला समजून घेत मला मदतीचा हात दिला, त्या सर्वांचा मी ऋणी आहे. विशेषतः भालचंद्र हिरे, अविण भामरे, आशिष गायगोळ आणि तुषार सांगोळे या माझ्या सहकारी मित्रांनी दिलेला पाठिंबा मोलाचा आहे. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, माझे लाडके विद्यार्थी! एका शिक्षकाला त्याच्या विद्यार्थ्यांनी काही तरी शिकवणं किंवा मदतीचा हात देणं, यासारखा दुसरा आनंद नाही. त्या सर्वांचेही मी मनःपूर्वक आभार मानतो. आज ही ‘राहून गेलेली गोष्ट’ असली, तरी उद्या ती माझी ‘जिंकलेली गोष्ट’ असेल, हा विश्वास मी बाळगून आहे. शिकण्याला वय नसतं आणि जिद्दीला मरण नसतं!