रणथंबोर आणि कुनो राष्ट्रीय उद्यानांच्या एका विशेष संयुक्त पथकाने घटनास्थळी तळ ठोकला आहे. अधिकारी चित्त्याच्या हालचालींवर चोवीस तास लक्ष ठेवण्यासाठी प्रगत ट्रॅकिंग उपकरणांचा वापर करत आहेत. ‘ही बाब अत्यंत कुतूहलजनक म्हणावी अशी आहे. जंगलातील हिंस्त्र प्राणी असलेल्या या मांसाहारी वन्यजीवांची इतकी जवळीक पाहायला मिळणे हे अत्यंत दुर्मीळ आहे, असे वन्यजीव तज्ज्ञ राजकुमार चौहान यांनी सांगितले.
घनदाट जंगलात आपापला निराळा आब राखून असणारे वाघ, बिबट्या आणि चित्ता हे तीन प्राणी एका वेळी एकाच ठिकाणी आढळले तर? रणथंबोर व्याघ्र प्रकल्पाच्या पर्यटन क्षेत्रात हा अत्यंत दुर्मीळ असा योग जुळून आला. या तीनही रुबाबदार प्राण्यांचे पर्यटकांना एकाच वेळी दर्शन झाले. वन्यजीवनाच्या दृष्टिने हा क्षण अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दुर्मीळ असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
चाकल नदीच्या काठावर वसलेल्या अभयारण्याच्या झोन ९ मध्ये रविवारी हा योगायोग पाहायला मिळाला. हे ठिकाण उद्यानाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून सुमारे ४५ मिनिटांच्या अंतरावर आहे. पर्यटक ज्यांना प्रत्यक्ष पाहण्यासाठी आतुर असतात आणि तासनतास घालवतात ते हे तीनही प्राणी त्या परिसरात एकाच वेळी एक ते दोन किलोमीटरच्या परिसरात पाहायला मिळाले. पर्यटकांनी हे दुर्मीळ दृश्य डोळ्यांत साठवून घेतले. तसेच वन्यजीवतज्ज्ञांचे लक्षही या आगळ्या घटनेने वेधून घेतले, असे रणथंबोरचे उपवनसंरक्षक आणि उपक्षेत्र संचालक मानस सिंह यांनी सांगितले.
‘जंगलाने आश्चर्यचकित केले. जंगलातील तीन मांसाहारी प्राणी वाघ, बिबट्या आणि चित्ता झोन ९ मध्ये एकाच वेळी दिसले. असे क्षण अत्यंत दुर्मीळ असतात’, असे वन विभागाने इन्स्टाग्रामवर म्हटले आहे. ‘केपी-२’ नावाचा चित्ता हा मध्य प्रदेशच्या कुनो राष्ट्रीय उद्यानात भटकंती करत असतो. गेल्या आठवड्यात या चित्त्याने राजस्थानमध्ये प्रवेश केला होता. रविवारी तो तेथे दिसल्यानंतर त्याने उद्यानाच्या झोन ८मध्ये शिरला.
वाघ हे शक्तीशाली, एकटे राहणारे मांसाहारी प्राणी आहेत. ते मोठ्या प्रदेशावर त्यांचे नियंत्रण प्रस्थापित करतात. मुख्य क्षेत्रांमध्ये इतर शिकारी प्राण्यांचे असणे ते खपवून घेत नाहीत. बिबट्या सामान्यतः वाघांशी थेट सामना टाळतो. तो घनदाट किंवा अधिक खडबडीत असलेल्या भूभागाकडे सरकतो आणि आपल्या हालचालींचे स्वरूप बदलतो, बहुतेकदा रात्री तो अधिक सक्रिय होतो. याउलट, चित्ते हे दिवसा शिकार करणारे प्राणी आहेत. ते मोकळ्या गवताळ प्रदेशाला प्राधान्य देतात. ताकदीपेक्षा ते वेगावर अधिक अवलंबून असतात. त्यामुळे जंगलाचे अधिवास आणि वाघांचे वर्चस्व असलेले प्रदेश त्यांच्या हालचालींसाठी अनुकूल नसतात. एका वेळी आणि एकाच ठिकाणी या प्राण्यांमध्ये परस्पर संपर्क होण्याची शक्यता मुळातच अतिशय कमी असते, असे चौहान यांनी सांगितले.







